विरुर स्टेशन येथील आरोग्यवर्धिनीलाच उपचाराची गरज, रुग्णांचे मोठे हाल…

0
116

विरुर स्टेशन येथील आरोग्यवर्धिनीलाच उपचाराची गरज, रुग्णांचे मोठे हाल…

विरुर स्टे. / राजुरा :- अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र याबरोबरच निरोगी आयुष्य जगण्यासाठी आरोग्य योग्य राहणेही तितकेच महत्वाचे आहे, हे वेगळ सांगायची गरज नाही. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा पाहता येथील व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून त्या संपूर्ण खिळखिळ्या झाल्याचे दिसून येत आहे. याचा फटका रोजच वर्षानुवर्षे ग्रामीण भागातील जनतेला सोसावा लागत आहे. मात्र दळभद्री शासनाला याचे काही नवल न वाटणे हेही तितकीच मोठी शोकांतिका आहे.

विरुर स्टेशन येथे परिसरातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नव्यानेच आरोग्य वर्धिनी ची इमारत बांधून रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र येथील अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बेजबाबदारपणे करत असल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. येथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय उपलब्ध नाही. रुग्णांच्या नातेवाइकांना घरूनच पाणी घेऊन रुग्णांना द्यावे लागत आहे. येथे तीन चार महिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्या प्रकृतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कर्तव्यावर आरोग्यसेविका व आरोग्यसेवक हजर राहत नसल्याने रुग्णांना अकस्मात होणारा त्रास कोणाला सांगावा..? उपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णांकडे लक्ष कोण देईल..? हाही मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने हि इमारत केवळ आरोग्य सेवेच्या नावाखाली देखावा ठरत आहे. पुरेशा सोयी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसून येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करत असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचेच म्हणणे आहे.

विरुर स्टेशन व चिंचोली येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासनालाच लागलेल्या आजारपणामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती प्राप्त आहे. कंत्राटी एजन्सी कडून या रुग्णालयात नियुक्त करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, अशी माहिती आहे. सातत्याने हि बाब शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ही येथील आरोग्य सेवकांचे पगार रखडलेले आहेत. त्यांना आपल्या घरूनच अन्न आणून खावे लागत असल्याने त्या कर्मचाऱ्यांतही प्रचंड ताण असल्याचे दिसून येत आहे. अतिसंवेदनशील असलेल्या आरोग्य यंत्रणेचे वाभाडे राज्यकर्त्यांनी काढले असून केवळ आपल्या खुर्चीसाठी हपापलेले असल्याची चर्चा ग्रामीण जनतेत आहे.

सरकारी आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही आणि खाजगी आरोग्य सेवा परवडत नाही अशा दुर्दैवाच्या कचाट्यात गरीब सर्वसामान्य माणसे होरपळत आहेत. त्यामुळे अनेकांना उपचाराअभावीच जगाचा निरोप घ्यावा लागत आहे. ही देशातील वाड्या- वस्त्या, डोंगर- कपारीत राहणाऱ्या लोकांची करूण कहाणी आहे. लोकशाही राज्य प्रणालीत तळागाळातील शेवटच्या माणसांपर्यंत सहज उपलब्ध होणारी दर्जेदार आणि सहज परवडेल अशी आरोग्य सेवा पोहोचविणे हे राज्यकर्त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र या संकल्पनेला बिनधास्तपणे तडा जात असताना प्रशासन निगरगट्ट झाले आहे.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या अतिसंवेदनशील आरोग्य यंत्रणेकडे तातडीने लक्ष वेधून विरूर स्टेशन येथील आरोग्यवर्धिनी ला योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून रुग्णांचे होणारे हाल थांबवावे व आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी परिसरातील ग्रामीण जनतेतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here