महसूल व वनविभागाच्या गाफीलपणामुळे ‘गब्बर’ बनले रेती चोरटे…

0
122

महसूल व वनविभागाच्या गाफीलपणामुळे ‘गब्बर’ बनले रेती चोरटे…

 

राजुरा (चंद्रपूर) : सद्या तालुक्यात सर्वत्र रेती चोरट्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसून येत आहे. महसूल व वन विभागाच्या गाफीलपणामुळे रेती चोरटे ‘गब्बर’ बनत असल्याची चर्चा सुजाण नागरिकांत केली जात आहे.

१४२ कंपार्टमेंट नंबर फॉरेस्ट हद्द सिद्धेश्वर, सुमठणा नाला व फॉरेस्ट हद्द, विरूर स्टेशन परिसर, सिंधी नाला, सास्ती, गोवरी, रामपूर, विहीरगाव असे एकूण संपूर्ण तालुक्यात वनविभाग हद्द व महसूल विभागाच्या हद्दीतून दिवसाढवळ्या तसेच रात्र पाळीत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून शासकीय महासुलाला लाखोंचा चुना लावला जात आहे. नाले पूर्णपणे पोखरले जात असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला जात आहे. मात्र या चोऱ्यांवर शासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने रेती चोरट्यांचे मनसुबे बुलंद झाले असून ते ‘गब्बर’ बनले आहेत.

“अशी कोणती चोरी आहे जी पकडल्या जात नाही, पण रक्षकच जर भक्षक बनले असतील तर मग कुठली कारवाई होईल? मग हेच चोरटे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरचढ होऊन अवैध कामे करतानाची परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यासह राजुरा विधानसभा क्षेत्रातही बघायला मिळत आहे. गोंडपिपरी तालुक्यात रेती चोरट्यांनी सरपंचाला केलेली मारहाण, यातून होणारे हल्ले व खून प्रकरण याला मुख्यत्वे जबाबदार सबंधित विभागाचे हेच आशीर्वाद दाते अधिकारी व कर्मचारी आहेत, अशी शंका जनतेत बळावत आहे.”

यावर वेळीच आवर घालण्याची जबाबदारी महसूल विभाग व वनविभागाची आहे. कारवाईचा थेट बडगा उगारल्यावरच या मुजोर रेती चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील आणि त्यांच्या उन्मादाला जरब बसेल. अन्यथा भविष्यात रेती चोरटे विभागालाच डोईजड होतील व पर्यावरणाचेही अतोनात नुकसान होऊन शासकीय महसूलही लुटला जाईल अशी संवेदना सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here