चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाशी संबंधित असणाऱ्या प्रलंबित समस्या त्वरेने दूर करण्याची मागणी…
मुंबई प्रतिनीधी : महेश कदम
चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे चर्मकार समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक मंत्रालयात नुकतीच झाली. त्यावेळी मयुर कांबळे यांनी nsfdc नवी दिल्ली यांची बंद असलेली कर्ज योजना पुर्ववत सुरु व्हावी तसेच महामंडळामधील रिक्त पदांची भरती व्हावी याकरीता चर्मोद्योग कामगार सेनेमार्फत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता व त्याची दखल घेत महामंडळामधील १०९ रिक्त पदांची भरती करीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली व nsfdc नवी दिल्ली यांची बंद असलेली कर्ज योजना पुर्ववत सुरु करण्यात आली त्याबद्दल सामाजिक न्याय विभाग व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले व चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाशी संबंधित असणाऱ्या प्रलंबित समस्या मागण्या बैठकीत मांडल्या.
• महामंडळाची माहिती देणारे संकेतस्थळ त्वरेने सुरु करावे.
• अत्यावश्यक सेवक म्हणून काम करणाऱ्या गटई कामगारांचे गुगल मॅपिंग करण्यात यावे.
• महाराष्ट्र शासनामार्फत गटई कामगारांना देण्यात येणारे ‘मोफत पत्र्याचे स्टॉल’ अंतर्गत मुंबई शहरात स्टॉल मिळावे याकरीता प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात यावी व मुंबई बाहेरील पात्र कामगारांना स्टॉलचे वाटप करण्यात यावे.
• महामंडळामार्फत कर्ज योजना व शिष्यवृत्ती योजना पुर्ववत सुरु करण्यात यावी.
• महामंडळाचा ताबा असणाऱ्या देवनार येथील जागेमध्ये महामंडळाचे प्रशासकीय कार्यालय बांधण्यात यावे. महामंडळनिर्मित चर्मवस्तूंसाठी शासकीय आरक्षण लागू करण्यात यावे.
• महामंडळाच्या मालकीच्या शोरूमचे स्ट्रक्चरल ऑडीट करून शोरुमची दुरावस्था दूर करावी.
• महामंडळाची उत्पादित केंद्रे अद्ययावत करण्यात यावीत.
• त्याचबरोबर होतकरू तरुणांसाठी व्यावसायिक ट्रेडचे प्रशिक्षण केंद्र व ज्येष्ठ गटई कामगारांसाठी निवृत्तीवेतन सुरु करण्यात यावे.
बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक धम्मज्योती गजभिये, बार्टीचे व्यवस्थापक सुनील वारे, मयुर कांबळे, संजय खामकर यांच्यासह भटु अहिरे, सीमा लोकरे, अशोक बागडे, स्वाती पोपट, विनोद सातपुते, शुभांगी डोके, महाराष्ट्रातील विविध संस्थेचे पदाधिकारी, समाज बांधव व चर्मोद्योग कामगार सेनेचे शिष्ट मंडळ उपस्थित होते. या बैठकीत मांडलेल्या मुद्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत महामंडळ स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात चर्मकार समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होईल अशी ग्वाही महामंडळाच्या व्यवस्थापकांनी दिली. चर्मोद्योग कामगार सेनेमार्फत चर्मकार समाजाच्या न्याय्य – हक्कांसाठी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत अधिकाऱ्यांनी आश्वासित केले त्याबद्दल मयुर कांबळे यांनी उपस्थितांचे पुनःश्च आभार मानले.