प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात…
अपघाताला बळी पडून स्वर्गाच्या दरबारात हजेरी लागल्यास त्यास जबाबदार कोण? नागरिकांना पडलेला प्रश्न?

राजुरा : राजुरा शहरातील जवाहर नगर येथे रस्त्याच्या मधोमध असणारा खड्डा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. खड्ड्यामुळे दुचाकींचे वारंवार अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा अपघाताला बळी पडून स्वर्गाच्या दरबारात हजेरी लागल्याने त्यास जबाबदार कोण ? असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सदर खड्डा हा मागील बारा ते पंधरा दिवसापासून याच अवस्थेत असून या संदर्भात तक्रार करूनही यात प्रशासनाची मात्र रस्ते दुरुस्तीबाबत उदासीनता दिसून येत आहे. पालिका प्रशासनाचे या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते. रस्तावरील पथदिवे सुद्धा बंद आहे. रस्त्याचा मधोमध नालीवरील पुलावर असणाऱ्या या खड्ड्यामुळे रात्रीच्या वेळेस या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या बांधकामाला एक वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाही म्हणून प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांना याचे परिणाम भोगावे लागत आहे.
जवाहरनगर येथील नागरिकांनी नगरसेवक तथा प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर यांनी केली आहे.