कटाक्ष:राजकारण मंदिराचे! जयंत माईणकर

0
421

 

कटाक्ष:राजकारण मंदिराचे! जयंत माईणकर

महाराष्ट्राचे संघाची काळी टोपी घालून कामकाज करणारे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याच्या प्रश्नावरून आपण हिंदुत्व विसरलात का ?,धर्मनिरपेक्ष झालात का ? असे प्रश्न विचारले तेव्हा यत्किंचितही आश्चर्य वाटले नाही. कारण शेवटी राम मंदिर उभारण्यासाठी अयोध्येत बाबरी मस्जिद पाडून त्यानंतर झालेल्या दंगलीत सुमारे दहा हजार लोकांचा बळी घेऊन मग सत्तेच्या पायऱ्या चढणाऱ्या संघ परिवाराचे कोशयारी पूर्ण वेळ प्रचारक स्वयंसेवक आहेत. या मंदिराच्या रक्तलांछित पायऱ्या चढूनच १९८४ ला केवळ दोन लोकसभा सदस्य असलेल्या भाजपने 303 पर्यंत मजल मारली आहे. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेला घास तीन पक्षांच्या युतीमुळे हिरावला गेल्यामुळे चेकाळलेला संघ परिवार आणि त्यांचे तथाकथित नेते मिळेल तिथे महाराष्ट्रातील सरकारची अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि महाराष्ट्रात ही अडवणूक करण्याचं ‘पुण्यकर्म’ राज्यपाल भगतसिंग कोशयारी इमाने इतबारे करत आहेत. तशी या कामाची सुरुवात त्यांनी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन गेल्या वर्षीच केली होती. पण ते शपथनाट्य अवघ्या ८० तासात संपलं. त्यानंतर गेल्या११ महिन्यात कोशयारीनी प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे सरकारला अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
कोशयारी महाराष्ट्राबरोबरच गोव्याचेही राज्यपाल आहेत. आणि तिथे भाजपचे सरकार आहे मात्र गोव्यात मंदिरे उघडावी म्हणून आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले नाही. गोव्यात गोवंश हत्येवर बंदी नाही. पण तिथे संघ परिवाराने भगवे कपडे घातलेले आपले तथाकथित गोरक्षक किंवा गोगुंड पाठवले नाहीत.याचा अर्थ भाजप ज्या राज्यात आपलं सरकार नाही तिथे जाणीवपूर्वक कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करत धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे. तर जिथे भाजपचे राज्य आहे तेथे मात्र सोयीस्करपणे अशा प्रश्नांकडे कानाडोळा करत आहे.

मंदिर उघडण्याविषयीच राज्यपालांच्या पत्रातील भाषा पाहून हे पत्र इंग्रजीचे प्राध्यापक आणि पत्रकार आणि मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचे पत्र आहे की एखाद्या आखाड्यातील साधू बाबाचं पत्र आहे असा सुरवातीला भास झाला. महाराष्ट्रात सत्ता आणण्यात अयशस्वी ठरलेल्या भाजपने मंदिर उघडून राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव तर खेळला नाही ना अशी शंका येते. आपल्या पत्रात जेव्हा राज्यपाल मंदिरे खुली न करण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत येतात का हा प्रश्न विचारतात तेव्हा आपण नक्की विज्ञान युगात राहत आहोत की संघाला अपेक्षित असलेल्या मध्ययुगीन किंवा सनातन काळात वावरत आहोत असं वाटत.

राज्यपालांनी उघडपणे महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे , असे दिसते. सेक्युलरीझम हा शब्द केवळ भारतीय राज्यघटनेतच नव्हे तर भाजपच्या घटनेतही आहे. पण तरीही कोशयारीचं वाक्य उघड-उघड संविधान विरोधी कर्तव्ये करण्यासाठी प्रवृत्त करणारं वाटत.

कोशयारी जेव्हापासून राज्यपाल झाले तेव्हापासून त्या पदाचा दर्जा दररोज घालविला जात आहे . आणि भाजपाच्या चांडाळ चौकडीला घेऊन राजभवनात राजकारण केलं जात आहे. मुळात सर्वच गैर भाजप शासित राज्यात राज्यपाल केंद्र सरकारच्या अर्थात नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर त्या सरकारला त्रास देत आहे ही वस्तुस्थिती आहे.
मुंबईची तुलना पाकीस्तानशी करणाऱ्या कंगना राणावतशी बोलायला राज्यपालांना वेळ असतो याचंही आश्चर्य वाटत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या सहा वर्षात पत्रकारांशी कधीही बोलले नाहीत आणि आपल्याला जे बोलायचं ते आपल्या एखाद्या हस्तकाकरावी ते बोलून घेतात. कोशयारींची संघ विचारसरणीची पत्रातून लिहिलेली मुक्ताफळे फारच वादग्रस्त ठरत आहेत अस लक्षात येताच त्यांनी आपल्या अत्यंत जवळच्या गुजराती मंत्र्याला म्हणजेच गृहमंत्री अमित शहाना सारवासारव करण्याची आज्ञा दिली आणि मग शहांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यपालांनी पत्रातील भाषा टाळायला हवी होती असे मोघम उद्गार काढले. म्हणजेच जे राज्यपाल म्हणाले ते संघ परिवाराच्या पॉलीसीला धरून असलं तरीही ते बोलून दाखविण्याची गरज नव्हती असा त्याचा अन्वयार्थ घेण्यास हरकत नाही. पण अशी कबुली दिली असली तरीही याचा अर्थ कोशयारीना पदावरून हटवले जाईल असा कोणी घेत असेल तर ती फार मोठी चूक असेल. संघ परिवाराच्या नियमानुसार एकदा एखाद्या व्यक्तीला पदावर बसवलं की जोपर्यंत ती व्यक्ती परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींना आव्हान देत नाही किंवा अगदी निरुपयोगी होत नाही तोपर्यंत हटवले जात नाही. वाजपेयी आणि अडवाणी हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. तर ज्येष्ठांना आव्हान देणाऱ्या बलराज मधोक, गोविंदाचार्य, संजय जोशी यांच पुढे काय झालं हे सर्वश्रुत आहे. कोशयारी कधीही परिवाराला आव्हान देणार नाहीत त्यामुळे त्यांना हटविण्याचा प्रश्नच नाही. पण लोकभावनेला अनुसरून भाजपने ही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच सारवासारव बाबरी पडल्यानंतर माफी मागून संघाने केली होती. त्यावेळी जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे “, अस वाक्य म्हणणारे स्व बाळासाहेब ठाकरेच होते. त्यावेळी जी भाजपची मंडळी बाळासाहेबांच्या मागे लपून बाबरी विध्वंस प्रकरणात स्वतः चा बचाव करत होती, आज तीच मंडळी बाळासाहेबांच्या राजकीय वारसदाराला उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करत आहेत.
काळाचा महिमा! असो!एकीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या वादग्रस्त शब्दांनी धार्मिकतेचा धुरळा उडवत आहेतच तर दुसरीकडे त्यांच्याच बाजूंच्या उत्तराखंडचे भगतसिंग कोशयारी आपल्या वादग्रस्त शब्दांनी महाराष्ट्रात नवीन प्रश्न निर्माण करत आहेत. आणि सर्वात वाईट गोष्ट या वातावरणातच आपल्याला पुढची चार वर्षे जगायचे आहे. तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here