भावी पिढी सिकलसेल मुक्त करण्यासाठी सिकलसेल निर्मूलन मिशन विविध विभागाच्या समन्वयाने यशस्वी करा – आ. किशोर जोरगेवार

0
262

भावी पिढी सिकलसेल मुक्त करण्यासाठी सिकलसेल निर्मूलन मिशन विविध विभागाच्या समन्वयाने यशस्वी करा – आ. किशोर जोरगेवार

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन मिशन कार्यक्रमाचे आयोजन

एकेकाळी पोलिओ हा मोठा आजार होता. पोलिओ मुक्त भारत अभियान राबवत या आजारावर आपण मात मिळविली आहे. आता सिकलसेल निर्मूलनासाठी केंद्रात मोदी सरकार प्रयत्नशील आहे. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पूढाकार घेतला असून भावी पिढी सिकलसेल मुक्त करण्यासाठी सिकलसेल निर्मूलन मिशन विविध विभागाच्या समन्वयाने यशस्वी करा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन मिशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे, डाॅ. बंडू रामटेके, डाॅ सोनारकर, डाॅ मंगेश गुलवाडे, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभाग युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, सिकलसेल च्या रुग्णांची संख्या चंद्रपूरात अधिक आहे. या आजाराचे जवळपास 3900 रुग्ण तर वाहक 35 हजार आहे. ही संख्या आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे याच्या निर्मुलनासाठी आपली मोठी जबाबदारी आहे. या आजाराच्या निर्मुलनासाठी सरकारने महत्वाचे पाऊल उचलले असून हा आजार अनुवंशिक असल्या कारणामुळे ज्या भागांमध्ये हा आजार आढळून येतो अशा भागामध्ये मिशन मोड पद्धतीने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यामध्ये सर्व आदिवासी क्षेत्रातील भागामध्ये सर्व स्तरावर जनजागृती करण्यात येणार असून रुग्ण,वाहक आणि निरोगी व्यक्ती या पद्धतीने रुग्णाचा शोध घेऊन तसेच वाहक व्यक्तीला आरोग्य सल्ला व भविष्यात घ्यावयाची काळजी, अॅनिमिया असलेल्या व्यक्तींनी घ्यावयाची काळजी या आजारात उद्भवणार्‍या अॅनिमिया त्यावरील उपाय योजना नवीन पिढी जन्माला येताना सिकलसेल ग्रस्त व्यक्तीने काय निर्णय घ्यावेत याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात नागरिकांनीही सहकार्य करावे असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमात रुग्णांना कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला डॉक्टर, परीचालिका व नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here