प्रगल्भतेचा आणि पूर्णतेचा राजमार्ग आहे नीतिशतकम् – डॉ. स्वानंद पुंड

0
294

प्रगल्भतेचा आणि पूर्णतेचा राजमार्ग आहे नीतिशतकम् – डॉ. स्वानंद पुंड

“मानवाला इतर सर्व पशुंपेक्षा वेगळा करणारी विशिष्ट गोष्ट म्हणजे नीतिमत्ता. पशुंना केवळ खाणे,पिणे, झोपणे हेच जमते. मात्र माणसाला यापेक्षा मिळालेल्या अनेक अधिकच्या गोष्टींमध्ये नैतिकता, संस्कार या गोष्टीं प्रधान आहेत. या नीतीमत्तेच्या संस्कारांच्या आधारेच आपण आपली जीवन प्रगल्भ आणि अंतिमतः पूर्ण करू शकतो. त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने नीतिशतकांचा अभ्यास आवर्जून करायला हवा.” असे आवाहन सुप्रसिद्ध संस्कृत अभ्यासक, लेखक तथा वक्ता विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांनी केले.
जैताई देवस्थानच्या चैत्र नवरात्रोत्सवात दुसऱ्या दिवशीची माळ गुंफताना संस्कृत भारती वणी शाखेद्वारे आयोजित व्याख्यानात नीतिशतकम् या विषयावर ते व्यक्त होत होते.
लॉकडाऊन च्या काळात केवळ आपल्या विद्यार्थ्यांच्या शाश्वत अध्ययनाची सोय म्हणून निर्माण झालेल्या गीर्वाण वाणी यूट्यूब चैनल स्वरूपातील हा उपक्रमाची पार्श्वभूमी विशद करीत पुढे आपले विद्यापीठ त्यानंतर सर्वच विद्यापीठ आणि शेवटी सर्वच संस्कृत प्रेमी जनांसाठी या उपक्रमाचे वाढवित नेलेले विस्तारित स्वरूप आणि त्याला देशाविदेशातील आबाल वृद्धांचा मिळालेला अफाट प्रतिसाद हे संस्कृत भाषेप्रती जनतेच्या मनात असलेल्या आत्मीयतेचे प्रतीक आहे हे त्यांनी अधोरेखित केले. आजही हजारो लोक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत याच पार्श्वभूमीवर मुद्दाम या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
साहित्य,संगीत आणि कला यांचे वैशिष्ट्य स्पष्ट करीत मानवी जीवन यांच्याशिवाय पशुतुल्य आहे ही महाकवी भर्तृहरींची भूमिका सुस्पष्ट करीत नीतिशतकम् च्या विविध श्लोकांच्या आधारे त्यांनी या ग्रंथाचे आणि त्यातील विवेच्य विषयाचे विविधांगी निरूपण सादर केले.
ग्रंथाच्या आरंभी असलेले अज्ञलक्षण जीवनात सुधारण्यासाठी किती आवश्यक आहे? हे स्पष्ट करीत आपल्यातील अज्ञान करणे हाच विकासाचा पहिला टप्पा आहे असे म्हणत त्यानंतर येणारी विद्या पद्धती, त्या विद्यावंताला मिळणारा मान, अशा आत्मसन्मान संपन्न व्यक्ती जवळच धन असायला पाहिजे म्हणून त्यापुढे धन पद्धती असे सांगत मुळात प्रत्येक सुभाषित स्वतःच्या ठाई वेगळे असले तरी त्या सगळ्यांमध्ये देखील एक अंतर संगती शोधता येते अशी अभिनव मांडणी विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैताई देवस्थानचे सचिव श्री माधव सरपटवार यांनी तर आभार प्रदर्शन विश्वस्त श्री चंद्रकांत अणे यांनी केले. वणीकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेला बहुसंख्येतील प्रतिसाद व्याख्यान विषयाप्रती जनतेच्या मनात असलेल्या औत्सुक्याचा निदर्शक होता.
आपल्या गावातून निर्माण झालेल्या आणि सध्या ९५०० वर लोकांनी रसास्वाद घेतलेल्या या गीर्वाण वाणी यूट्यूब चैनल वरील नि:शुल्क उपक्रमाचा अधिकाधिक संस्कृत प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here