The Indian Express ग्रुपची ‘स्प्राऊट्स’ला १०० कोटी रुपयांची धमकीवजा नोटीस

189

The Indian Express ग्रुपची ‘स्प्राऊट्स’ला १०० कोटी रुपयांची धमकीवजा नोटीस

 

 

स्प्राऊट्स Exclusive

५० हजार रुपयांचे गिफ्ट घेतल्यामुळे अडचणीत आलेल्या ‘लोकसत्ता’ या दैनिकाच्या संपादकाची ‘स्प्राऊट्स’ने पोलखोल केली व त्यामुळे संपूर्ण The Indian Express ग्रुपची विश्वासार्हताच पणाला लागली. ही पत व विश्वासार्हता सुधारण्याऐवजी ‘स्प्राऊट्स’च्या संपादकांनाच १०० कोटी रुपयांची धमकीवजा नोटीस या ग्रुपने पाठवली. त्यामुळे शोध पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रयत्न एक्सप्रेस ग्रुप करीत आहे, हे स्पष्ट दिसून येते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी दिवाळीच्या निमित्ताने स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम स्नेहमिलनाच्या गोंडस नावाखाली व्हाऊचर्स गिफ्ट देण्यासाठी होता. सर्वकाही सुनियोजित होते. ठरल्याप्रमाणे या कार्यक्रमाला मुंबईतील राजकीय बिट कव्हर करणारे पत्रकार व संपादक हजर होते.

बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळात ‘मेघदूत’ या फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी १५० हून अधिक पत्रकार हजर होते. या कार्यक्रमात प्रत्येक पत्रकाराला ५० हजार रुपये किंमत असलेलली रिलायन्स कंपनीची गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात आली. ही व्हाऊचर्स वापरुन ५० हजार रुपयांची खरेदी करता करता येते, त्यामुळे साहजिकच या कार्यक्रमासाठी झुंबड उडालेली होती.

या पत्रकार व संपादक मंडळींमध्ये गिरीश कुबेरही होते. कुबेर हे The Indian Express या ग्रुपमधील लोकसत्ता दैनिकाचे संपादक आहेत. त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. तेथे ते भरपेट जेवले व त्यांनतर त्यांनी ५० हजार रुपये किमतीचे व्हाऊचर्स घेतले, अशी बातमी ‘स्प्राऊट्स’ या मुंबईतील विश्वासार्ह दैनिकाने सर्वप्रथम दिली.

‘स्प्राऊट्स’च्या या बातमीची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली. अनेक संघटनांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली व ही बातमी चव्हाट्यावर आणल्याबद्दल ‘स्प्राऊट्स’चे अभिनंदनही केले.

या बातमीमुळे मात्र गिरीश कुबेर अस्वस्थ झाले. त्यांच्या The Indian Express ग्रुपने त्यांना जाब विचारला व त्वरित राजीनामा देण्यास सांगितल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे धास्तावलेल्या कुबेर यांनी ‘मी ५० हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर्स घेतले नाहीत, मी राजीनामा देणार नाही’, असे लोकमान्य टिळकांच्या भाषेत निक्षून सांगण्याचा प्रयत्न केला व दुर्दैवाने तो त्यांच्या मॅनेजमेंटला पटलाही.

वास्तविक The Indian Express ग्रुप हा शोधपत्रकारितेला पहिल्यापासूनच महत्व देत आलेला आहे. त्याबद्दल त्यांनी ‘स्प्राऊट्स’चे अभिनंदन करायला हवे होते व या प्रकरणी कुबेर यांची अंतर्गत चौकशी करायला हवी होती.

इथे घडले उलटेच, या एक्सप्रेस ग्रुपने ‘स्प्राऊट्सला’च बिनशर्त माफी मागायला सांगितली व ती न मागितल्यास १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचीही धमकीवजा नोटीस पाठवली. इतकेच नव्हे तर तशी बातमीही लोकसत्ता या दैनिकांमध्ये ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली.

वास्तविक ५० हजार रुपयांचे गिफ्ट व्हॉउचर्स घेतले कुबेर यांनी व त्यांच्या मॅनेजमेंटने १०० कोटी रुपयांचा दावा टाकला ‘स्प्राऊट्स’वर. हा तर ‘स्प्राऊट्स’चे संपादक व टीमचे मानसिक खच्चीकरण करण्याचा डाव आहे. मात्र स्प्राऊट्स, त्याचे संपादक व स्प्राऊट्सची स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम (SIT ) ही आपल्या बातमीवर ठाम आहे.

लोकसत्ता दैनिकामध्ये संपादक झाल्यापासून कुबेर यांनी किती महत्वाच्या बातम्या ‘मॅनेज’ केल्या. किती बेकायदेशीर मालमत्ता गोळा केली, याची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करायला हवी, अशी मागणी ‘स्प्राऊट्स’तर्फे लवकरच करण्यात येणार आहे.

कुबेर यांनी ‘असंतांचे संत’ हा अग्रलेख लिहिला व नंतर तो मागेही घेतला. त्यानंतर माफीही मागितली. त्यामुळे अग्रलेख मागे घेणे, माफी मागणे, ही लोकसत्ता दैनिकाची परंपरा आहे, स्प्राऊट्सची नाही, हे लोकसत्ताच्या मालकवर्गाने समजून घ्यावे.

‘स्प्राऊट्स’वर याअगोदरही ‘हिमालय’ कंपनीने मुंबई हायकोर्टात १ हजार कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आम्ही वारंवार आवाज उठवला आहे, त्यामुळे त्यांनीही कोट्यवधी रुपयांचा दावा दाखल केलेला आहे, असे असंख्य खटले दाखल असूनही ‘स्प्राऊट्स’ वाचकांच्या कृपेने शेवटपर्यंत लढत राहील.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य: उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

advt