शिक्षण महत्वाचे आहे पण आपल्या नात्यापेक्षा नाही!

0
646

शिक्षण महत्वाचे आहे पण आपल्या नात्यापेक्षा नाही!

 

मूल, चंद्रपूर – किरण घाटे : महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं सदस्या तथा वैदर्भिय सुपरिचित लेखिका स्मिता बांडगे यांनी आजच्या वास्तव परिस्थितीवर एक संक्षिप्त लेख शब्दांकित केला आहे .ताे खास आम्ही वाचकांसाठी येथे देत आहाे .

 

 

नुकतीच वर्तमानपत्र आणि टी वी न्यूज चॅनलवर बातमी ऐकून मन सुन्न झाले . एका डॉक्टर होणाऱ्या मुलीला तिच्या आईने अभ्यास कर म्हणून तगादा लावला .त्यामुळे जन्मदात्या आईचा पट्ट्याने गळा आवळुन मुलीने हत्या केली.तर दुसरीकडे आईने अवघ्या साडेतीन वर्षाच्या आपल्या चिमुकल्या मुलाचा खून केला. काय चालले आहे खरचं नात्या पेक्षा शिक्षण महत्वाचे आहे काय ? हा प्रश्न आपल्याला निश्चितच पडेल .

 

 

शिक्षणाने मनुष्याचे जीवन सुखी होते त्यामुळे उत्तम जीवन जगण्यास शिक्षण घेणे गरजेचे आहे.त्यासाठी आपल्या पाल्याला योग्य घडवणे त्यांच्यावर योग्य संस्कार करणे हे आईवडिलांचे आद्य कर्तव्य आहे . पण मुले ही कोमल मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात .कुंभार जसा मातीला आकार देतो तशी भांडी तयार होत असतात.पण तीच माती योग्य नसेल किंवा वातावरण योग्य नसेल तर कुंभाराला सुद्धा मनासारखी भांडी तयार करता येत नाही म्हणून तो घरातील माती काही फेकून देत नाही तर योग्य वातावरणाची वाट बघतो. त्याच्या कामावर त्याचे पोट अवलंबून असते तरी तो संयम बाळगतो.प्रश्न पडतो असा की आज जन्मदात्या आईने अभ्यास केला नाही किंवा तो करत नाही म्हणून चक्क त्याचा जीव घ्यावा ही किती आई जातीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. मुलाला जन्म देताना त्या मातेने काय काय नसेल सोसले .काय काय कष्ट घेतले असेल आणि आज त्याची निर्घृण हत्या. आज या घटनेने संपूर्ण हादरा बसलेला आहे .

 

 

आज कोरोना महामारी ने थैमान घातले असताना आपण आपला आणि आपल्या आप्तेष्टांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय .कधी आपल्यावर निसर्ग कोपतोय , प्रलय महापूर येतो आणि निष्पाप लोकांचे त्यात बळी जातात .त्यासाठी आपले सरकार शर्थीचे प्रयत्न करतात. लोक स्वतः चा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवतात .असे असताना एक आई आपल्या बाळाचा जीव घेते आणि दुसरीकडे त्या विरूध्द आई अभ्यास कर म्हणते म्हणून तिची अमानुष हत्या करते ह्या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. भविष्यात असे कधी घडू नये असे कळकळीचे मत व्यक्त करावे म्हणून हातात लेखणी घेऊन लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.
जीवनदान करा पण कुणाचा जीव घेऊ नका.

स्मिता धनराज बांडगे
मूल, जि. चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here