उद्यापासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत

0
547

उद्यापासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत

चंद्रपूर दि. 14 ऑगस्ट : ब्रेक दि चेन अंतर्गत निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार, जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, बाजारपेठेची वेळ सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

 

 

उपहारगृहे आसनव्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने दिलेल्या अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे. यामध्ये खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे, बारमध्ये प्रवेश करतांना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील. याबाबतचा स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपरोक्त सूचनेनुसार उपहारगृह, बार सुरू ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. मात्र पार्सलसेवा 24 तास सुरू राहील.

 

 

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने (अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक), शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. जिम्नॅशियम, योग सेंटर, सलून, स्पा वातानुकूलित तसेच विना वातानुकूलित जिम्नॅशियम, योग सेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील. इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. दोन्ही मात्रा पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील.

 

 

सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

 

तसेच खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने त्यांच्या नियमित वेळेत कोविड वर्तणूक विषयक सर्व नियमांचे पालन करून सुरू राहतील.

 

 

खुल्या प्रांगणातील, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्तीच्या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादेत असेल.

 

 

मात्र कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकरणाला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

 

 

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळे, धार्मिकस्थळे, पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील. तसेच सर्व सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

 

 

ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहील. गर्दी, जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे इ. वरील निर्बंध कायम राहतील. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हाताची स्वच्छता, शारीरिक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध इ. सर्व निर्बंधाचे पालन करणे अनिवार्य राहील.

 

 

सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक, व्यवस्थापनाने त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होऊन 14 दिवस झाल्याची खातरजमा करावी व कर्मचाऱ्यांची यादी लसीकरण माहिती, प्रमाणपत्रासह तयार ठेवावी व सक्षम प्राधिकारी यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावी.

 

 

सदर आदेश संपुर्ण चंद्रपूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात दि. 15 ऑगस्ट 2021 पासुन पुढील आदेशापर्यंत लागू राहील. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविला संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here