कटाक्ष:आज रामशास्त्री प्रभुणे असते तर! जयंत माईणकर

0
419

कटाक्ष:आज रामशास्त्री प्रभुणे असते तर! जयंत माईणकर

बाबरी विध्वंस प्रकरणात सीबीआय कोर्टाने लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलंआणि माझ्या मनात विचार आला आज रामशास्त्री प्रभुणे असते तर त्यांनी असा निर्णय दिला असता?

रामशास्त्री प्रभुणे! पेशवाईच्या इतिहासातील एक अजरामर नाव! रघुनाथराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई याना नारायणराव पेशव्यांच्या खुनासाठी जबाबदार ठरवून देहांत प्रायश्चित्त ही शिक्षा सूनवणारे नि:पक्ष न्यायमूर्ती! तलवारी घेऊन आपल्या अंगावर चालून येणाऱ्या चार मारेकर्यांपासून स्वतःला वाचवत १७ वर्षाचे नारायणराव पेशवे ‘काका मला वाचवा’ म्हणत घुसले ते नेमके रघुनाथरावांच्या महालात. आणि इतिहासातील नोंदीप्रमाणे चार मारेकार्यानी रघुनाथराव आणि आनंदीबाईंच्या समोरच नारायणराव पेशवे यांचा खून केला.

कायद्याच्या भाषेत आजही आपल्यासमोर एखादा गुन्हा घडत असताना त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही तर त्या गुन्ह्याला आपला पाठिंबा आहे असा अर्थ घेतला जातो. नेमका तोच अर्थ १७७2 साली रामशास्त्री प्रभुणेनी घेत रघुनाथराव आणि आनंदीबाईंना देहांत प्रायश्चित्त अशी शिक्षा ठोठावली.

रघुनाथराव साधी असामी नव्हती. थोरल्या बाजीरावांच्या चार पुत्रांपैकी एक.कर्तबगार! अटकेपार युद्धात विजयाचा झेंडा रोवणारे! वयाने लहान असलेल्या नारायणरावांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे! पण नारायणरावास धरावे या आदेशाचे परिवर्तन आनंदीबाईंनी मारावे अस केलं या आणि इतर सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांचा वापर करत रामशास्त्रीनी देहांत प्रायश्चित्त ही सजा दोघांना ठोठावली होती. या घटनेच्या सुमारे २४ वर्षे आधी म्हणजे १७४८ साली फ्रेंच विचारवंत मॉंटेस्क्यू याने सत्ताविभाजनाचा सिद्धांत मांडत न्यायपालिकेला राजव्यवस्थेपासून वेगळं करून एक नवी व्यवस्था निर्माण केली. आज जगातील सर्व लोकशाहीप्रधान देश किंवा जवळपास ८०० कोटी मानवी लोकसंख्येपैकी सुमारे ७०० कोटीहून जास्त मानव, १६६ देश याच पद्धतीने चालतात. लोकशाहीप्रधान देशातील न्यायव्यवस्था ही राजसत्तेच्या दडपणाखाली कधीच नसते किंवा नसावी अशी अपेक्षा असते. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. अर्थात इथली न्यायव्यवस्था उत्तर कोरीया किंवा तत्सम हुकूमशाही देशातील राजसत्तेच्या दबावाखाली चालणारी नसावी अशी अपेक्षा!

पण नुकत्याच बाबरी प्रकरणात लखनौच्या सीबीआय कोर्टाद्वारे दिलेल्या निकालाने ही व्यवस्था खरच नि:पक्षपाती आहे किंवा नाही याविषयी शंका उत्पन्न होते. अगदी शरद पवारांसारख्या नेत्यानेही मोदी आणि योगींच्या राज्यात आलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य वाटायला नको अशी प्रतिक्रिया दिली. सीबीआय कोर्टाने बाबरी विध्वंस ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असून पूर्वनियोजित कट नसल्याचं म्हणणं हे जास्त वादग्रस्त आहे.१९९२ ला देशभरातून हजारो कारसेवक अयोध्येला आले तेव्हा त्यांच्यापैकी काहीजण कुदळ, फावडे घेऊन आले होते असे बाबरी प्रकरणातील एक साक्षीदाराने नुकतंच टी व्ही वरील चर्चेत सांगितले. यालाच पूर्वनियोजित कट अस कायद्याच्या भाषेत म्हणतात. पण सीबीआय कोर्टाने त्या काळातील व्हिडीओ फुटेज, पत्रकार परिषदा, वृत्तपत्रात आलेला मजकुर याला कुठेही ग्राह्य धरले नाही.एक प्रकारे कुठल्याही परिस्थितीजन्य पुराव्याला ग्राहय मानायचेच नाही अस तर न्यायालयाने ठरवून ठेवले नव्हते अशी शंका येते. वास्तविक पाहता या संपूर्ण प्रकरणात आरोपी भाजपची नेतेमंडळी! पण हे आरोपी जणू फिर्यादी असल्याच्या भाषेत बोलू लागली आणि बाबरी पाडण्याचा संबंध एक हजार वर्षांपासूनच्या मुस्लिम आक्रमणकाऱ्यांशी जोडू लागली. संघ परिवाराच्या सक्रीय सहकार्याने पसरविल्या जाणाऱ्या अफवा आणि बाबरी विध्वंस तसच गोध्रा दंगल याच फलित म्हणून २०१४ पासून या देशावर भाजपचे राज्य आहे. अर्थातच आरोपी पासून फिर्यादी बनलेला भाजप तथाकथित रित्या न्यायाधीश किंवा न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकणारा झाला आहे की काय अशी रास्त शंका येते.

बाबरी विध्वंस ही एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया या निर्णयाने एक चुकीची परंपरा सुरू होईल असं वाटत. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया समाजाच्या सर्वच घटकात उमटू लागतील. आणि प्रत्येक वेळी या उत्स्फूर्ततेला परंपरेनुसार माफीपण मिळेल. माझ्या पत्रकारितेची सुरुवात यवतमाळच्या एक छोट्या दैनिकातून झाली. या दैनिकात एकदा राजाश्रय असलेल्या स्थानिक गुंडांबद्दल काही बातम्या छापून आल्या होत्या. त्यावेळी तथाकथित ‘उत्स्फूर्तपणे’ या राजकीय गुंडाचे समर्थक माझ्या कार्यालयात या बातम्या का आल्या, हे विचारून गेले. त्यावेळी मी कार्यालयात नसल्याने पुढील हिंसक प्रसंग टळला होता.

आज माझ्या संघ-भाजपविरोधी लिखाणाने आणि टी व्ही वरील चर्चेमुळे ‘स्वयंसेवकांच्या’ एखाद्या गटाने माझ्यावर अथवा माझ्या घरावर हल्ला केल्यास त्यालाही ‘उस्फुर्त’ प्रतिक्रिया मानून माफ करण्यात येईल अशी शंका येते.

आणि मग प्रकर्षाने आठवण होते ती रामशास्त्री प्रभुणे यांची! आजच्या भारतीय न्यायव्यवस्थेत रामशास्त्री प्रभुणे दिसतील?वाट पाहत आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here