राजुऱ्यात रेती तस्करी जोमात

0
487

राजुऱ्यात रेती तस्करी जोमात

 

राजुरा : तालुक्यात जुलै महिन्यामध्ये पावसाने जोरदार ‘बॅटिंग’ केल्याने नाले रेतीने तुडुंब भरले आहे. आता याच रेतीच्या तस्करीसाठी तस्करांनी कंबर कसली आहे. त्यांनी रेती चोरीसाठी टाइट ‘फिल्डिंग’ लावली आहे. पण दुसरीकडे मात्र तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी महसूल कर्मचारी सपशेल अपयशी ठरले आहे. त्यांच्या याच ढिलाईमुळे तस्करांना मोकळे रान मिळत आहे.

जुलै महिन्यात धुवांधार पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच नाल्यात रेतीचा मोठा साठा झाला आहे. सध्या राजुरा, सुमठाणा, तुलाना, टेंबुरवाही, चिचबोडी, खांबाळा, विरूर, चिंचोली, नलफडी, विहिरगाव, कापणगाव, रामपूर, गोवरी, सोंडो, देवाडा व नदी पट्ट्यातील नाले रेतीने तुडुंब भरले आहे. यातील काही नाले जंगलाला लागून असल्याने त्या नाल्यात बारीक व दर्जेदार रेती पहायला मिळत आहे. आता याच रेतीवर तस्करांची वाकडी नजर पडली आहे.

आजघडीला विहीरगाव, नालफडी, सुमठाणा, विरूर, चिंचोली, रामपूर आदी नाल्यात तस्करांनी हल्लाबोल केला आहे. शहरातील ६ ते ७ ट्रॅक्टर तस्करांनी या नाल्यात धुमाकूळ घातला आहे. या रेती तस्करीसाठी नाल्यात मोठमोठे खड्डे खोदण्यात येत आहे.अवाढव्य उपसा करण्यात येत असल्याने नाल्याच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वरूणराज्याच्या तुफानी ‘बॅटिंग’ नंतर आता रेती तस्करी करीता तस्करांनी टाइट ‘फिल्डिंग’ लावली आहे.दररोज नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मात्र महसूल कर्मचाऱ्यांना तस्करांची फिल्डिंग भेदण्यात अपयश येत असल्याने तस्करी जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या याच ढिलाईमुळे तस्करांना मोकळे रान मिळत आहे. त्यामुळे शासनाला लाखोंच्या महसुलापासून वंचित राहावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here