ग्रामीण आरोग्य सेवेलाच उपचाराची गरज

0
1110

ग्रामीण आरोग्य सेवेलाच उपचाराची गरज

प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली (बु.) रामभरोसे

रुग्णांच्या आरोग्याशी खेळ

 


राजुरा : आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांच्या दुर्लक्षितपणामुळे चिंचोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुन एक महिन्यापासून वैद्यकीय रजेवर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. गेल्या महिनाभरापासून निवासी वैद्यकीय अधिकारी व आवश्यक कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. आरोग्य केंद्रात गरीब, गरजू रुग्णांवर उपचार होत नसल्याने ग्रामीण आरोग्य केंद्रांनाच उपचाराची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 

चिंचोली (बु.) येथील रहिवासी सोनू चंपत बोरकुटे (24) या युवकावर काल विष प्राशन केल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने येथील परिचर यांनी आरोग्यसेविका यांना बोलावले तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून विचारणा केली. त्यांनी चिट्ठीवर औषध लिहून दिले. सदर युवकाला राजुरा येथे रेफर करण्यात आले. राजुरा येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात चिंचोली येथे उपचार झाला असल्याने उपचार करण्यास नकार दिला. मात्र रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांनी उपचार झाला नसल्याचे सांगितले व उपचारासाठी आग्रह धरल्यानंतर उपचार करून चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र उपचाराला प्रकृतीने साथ न दिल्याने सोनू चा प्राण गेल्याची माहिती समोर येत आहे. एकाच आठवड्यात दोन युवकांचे नाहक बळी आरोग्य यंत्रणेने घेतले. नागरिकांच्या मनात चांगलाच आरोग्य यंत्रणेविरोधात रोष दिसून येत आहे.

 

रुग्णाला दाखल केल्यानंतर उपचार करण्यासाठी वरिष्ठांना फोनवर संपर्क केला. प्राथमिक उपचारासाठी औषधी चिट्ठीवर लिहिली. मात्र आरोग्यसेविका बाहेर असल्याने कोणताही उपचार करण्यात आला नाही. रुग्णाला रेफर करण्यात आले. असे परीचरांनी इम्पॅक्ट24न्यूज शी बोलतांना सांगितले. चिंचोली (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

प्राथमिक आरोग्य रुग्णालयाचा डोलारा आरोग्य सेविका व परिचर यांच्या खांद्यावर पडला असल्याचे एकंदरीत आरोग्य यंत्रणेचे केविलवाणे चित्र दिसून येत आहे. सिएचओ सकाळी 10 वाजेनंतर रुग्णालयात येतात. तसेच बाहेरून आरोग्यसेविका येत असल्याने रुग्णांना ताटकळत राहावे लागते. संध्याकाळी 5 वाजेनंतर रुग्णालयात कोणीही अधिकारी नसल्याने रुग्णांचे बेहाल होत आहेत. रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने चिंचोली (बु.) रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावा-खेड्यातील रुग्णांना उपचारासाठी जाऊन त्यांना आल्या पावली परत खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत आहे. याचा गरिबांना आर्थिक भुर्दंड बसतो. वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. पाच सहा दिवसांगोदर स्थानिक एका युवकाचा बळी आरोग्य यंत्रणेच्या असंवेदशीलतेने घेतल्याचा आरोप स्थानिक सुजाण नागरिकांनी केला आहे. तातडीने रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्यास रुग्णालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here