लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

0
1237

लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद

 

राजुरा/चंद्रपूर, ३० एप्रिल : काल राजुरा शहरात लाचलुचपत विभाग नागपूर चमूने धाड टाकून उपविभागीय पोलीस कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. हि कारवाई काल दुपारी 3 वाजेच्या आसपास करण्यात आली असून यावेळी सदर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपये रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आले. विशेषतः ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या वाहनातून 2 लाख 40 हजार रुपयेची रोकड मिळाल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर धाड टाकून लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली. यामुळे शहरात व तालुक्यात चांगलेच चर्चेला उधाण आले आहे.

बल्लारपूर येथील दारू विक्रेत्याकडून उपविभागीय पोलीस कार्यालय राजुरा येथील कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. याची तक्रार संबंधित व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाने दिली. या तक्रारीच्या आधारे नागपूर चमूने सापळा रचून दोन कर्मचाऱ्यांना रोख रकमेसह रंगेहाथ ताब्यात घेतले.

राजेश त्रिलोकवार

“ताब्यात घेतलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांत राजुरा एसडीपीओ यांचा रायटर राजेश त्रिलोकवार (52) तर दुसरा वाहन चालक सुधांशू मडावी (40) असल्याने राजुरा पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विभागातील मोठे मासे यात अडकण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.” एवढी मोठी कारवाई होऊनसुद्धा उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) उपस्थित नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला असून यात खुद्द एसडीपीओ सहभागी तर नाही ना…? अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित सुजाण नागरिक व संपूर्ण शहरात जोरात सुरू आहे. यामुळे एकंदरीत पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुधांशु मडावी

 

अखेर चौथ्यांदा रचल्या गेलेल्या सापळ्यात अडकले कर्मचारी

याअगोदर ही सदर लाच प्रकरणी तीनदा सापळा रचण्यात आला होता. मात्र तीनवेळा लाचलुचपत नागपूर विभागाने रचलेल्या सापळ्यात विभागाला काही हाती लागले नाही. मात्र काल दिनांक 29 एप्रिलला रचलेल्या सापळ्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन कर्मचारी मोठ्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई काल दुपारी 3 वाजता करण्यात आली तर दोषी कर्मचार्यांविरोधात रात्री 3 वाजता म्हणजे तब्बल 12 तासांनी गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींची पहाटे रामनगर तुरुंगात रवानगी करण्यात आली.

 

 

एवढी मोठ्या रसदीचा मानकरी कोण…?

रंगेहाथ पकडलेल्या कर्मचाऱ्यांकडून 2 लाखांच्या वर रोकड जप्त करण्यात आली. यामुळे रायटर व वाहनचालक यांनी कोणासाठी एवढ्या मोठ्या रकमेची मागणी केली…? हा यक्ष प्रश्न अजून तरी कोळ्यात असून चौकशीअंती राजुरा पोलीस विभागाचे पितळ उघड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

आत्महत्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीला वाचविण्यासाठी पोलीस विभागच हतबल

लाचलुचपत विभाग नागपूर टीमने ताब्यात घेतल्यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी सोडण्यात आले. मात्र लघुशंकेच्या बहाण्याने गेलेला आरोपी पोलीस कर्मचारी त्रिलोकवार यांनी नगरपरिषद राजुरा समोरील तलावात आत्महत्या करण्यासाठी तब्बल दोन तासांच्या अवधीनंतर 10 वाजेच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतली. अंधारात ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोणतीच ठोस भूमिका न घेता प्रशासनाची केविलवाणी धडपड पाहता सामान्य माणसाच्या मदतीसाठी येणारी यंत्रणा प्रशासनाच्या मदतीसाठी उपस्थित जनतेसमोर टाहो फोडताना दिसून आली. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी एकमेकांवर दोषारोप तसेच नोकरी वाचविण्यासाठी उपस्थित नागरिकांसमोर हात जोडणी करून हतबल ठरल्याचे दिसून आले. तसेच तलाव सफाईत नगरपरिषद प्रशासन व पोलीस विभाग अत्यावश्यक गंभीर प्रसंगी गोताखोर व बोटिंग व्यवस्था करण्यात हतबल ठरत केविलवाणी धडपड करताना दिसून आल्याने, हि केविलवाणी कवायत दुर्भाग्यच…!
पोलीस देखरेखीखाली असलेला आरोपी आत्महत्येच्या प्रयत्नांसाठी सरसावला कसा? हा मोठा प्रश्न असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच सुजाण नागरिकांडून ताशेरे ओढण्यात आले.

लघुशंका वेळ ७.४५ आहे. मात्र त्यांचे सुरक्षेचे च काम राजुरा पोलिसांचे असताना मग ‘ते’ तेवढे मोघम राहून आरोपीला जाऊ कसे दिले? लघुशंकेला सोबत का बरं हजर नव्हते?
एसीबी एवढी गाफील कशी राहून कार्यवाही करते की, त्यांच्या कस्टडी तील आरोपी चक्क फरार होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. नेमके या कृत्याने काय सिद्ध होते की तो निर्दोष आहे आणि अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतोय?
अखेर एपीआय साखरे यांचे रायटर संपत पुलिपाका यांनी अथक परिश्रम घेऊन त्रिलोकवार यांना तालावाबाहेर आणून त्यांचे प्राण वाचविले.

 

बल्लारपूर येथील देशी दारू व्यावसायिकाने सदरची तक्रार केली होती. यात काही राजकीय महोदयांचाही सहभाग असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे. एकंदरीत देशी दारूचा अवैध पुरवठा तेलंगणात नित्यनेमाने होतो की काय…? आणि त्यावर पांघरून टाकण्यासाठी पोलीस विभागाकडून ‘रसदी’ची मागणी केली जाते. हाही एक जनतेला अवाक करणारा प्रश्न समोर आला आहे. या कारवाईने ‘कुंपण च शेत खाते’ अशी परिस्थिती राजुरा उपविभागीय पोलीस कार्यालयात अनुभवायला मिळाली.

 

 

हप्तेवारी ची मिळाली यादी, चौकशीअंती मोठे घबाड समोर येणार…

दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून लाचलुचपत विभागाला हप्ता, महिन्याची रसद मिळणाऱ्या अवैध धंदेवाईकांची यादी मिळाली. अवैध धंद्यांना पोलीस विभागच खतपाणी घालतय का…? अशी म्हणण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे. यामुळे आयकर विभागाकडून प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्यात येण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे. या चौकशीअंती मोठे घबाड समोर येऊ सदर कर्मचारी व अधिकारी यांच्याकडे नवनव्या चार चाकी तसेच महागड्या दुचाकी घेण्यासाठी पैसे येतो कुठून…? याचा उलगडा होणार अशी चर्चा शहरात सुरू आहे.

हि राजुऱ्यातील लाचलुचपत विभागाची पोलीस प्रशासनातील मोठी कारवाई असून वसुलीकर्ता पोलीस कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सदरची कारवाई नागपूर लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधिक्षक श्रीमती चाफले व चमूने पार पाडली. मात्र कारवाई अंती चाफले यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here