वीर बाबूराव शेडमाके यांचा पुतळा हटविल्याने समाज बांधवात रोष

0
707

वीर बाबूराव शेडमाके यांचा पुतळा हटविल्याने समाज बांधवात रोष

परवानगी नसल्याने पोलीस प्रशासनाने स्वत:हून केली कारवाई

या ठिकाणी वीर बाबुराव शेडमाके यांचा पुतळा बसविण्यात आला

नांदाफाटा: क्रांतिवीर वीर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नांदा येथे २० मार्चला क्रांतिवीर बिरसा मुंडा बहुउद्देशीय मंडळ , नांदा व समस्त आदिवासी समाज बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या थाटामाटात रॅली काढून वीर बाबूराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा केला. या निमित्त वीर बाबूराव शेडमाके यांचा पूर्णाकृती पुतळा विधिवत पूजा अर्चना करून बसविण्यात आला. आयोजित कार्यक्रमाला गावातील सर्वच राजकीय पक्षांची साथ व सहभाग होता. कार्यक्रमात स्थानिक पोलीसही उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा झाला. परंतु पुतळा बसविण्याकरिता आवश्यक परवानगी नसल्याचे कारण देत पोलीस प्रशासनाने स्वत : हून कारवाई करत अचानक पुतळा हटविण्याचे निर्देश दिले. आदिवासी समाज बांधवासह गावातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी पाेलिस प्रशासनाला पुतळा हटविण्याचे आदेश मागे घ्यावे अशी विनंती केली. मात्र पोलिस प्रशासनाने विनंती मान्य न केल्याने अखेर वीर बाबूराव शेडमाके यांचा पुतळा रात्रीला उशीरा स्वयंस्फूर्तीने हटविण्यात आला. मोठय़ा आस्थेने वीर बाबूराव शेडमाके यांचा पुतळा बसविण्यात आला. बसविलेला पुतळा हटविल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष होता.

या ठिकाणाहून वीर बाबुराव शेडमाके यांचा पुतळा हटविण्यात आला

गावातून कोणाचीही तक्रार नसताना केवळ परवानगी घेतली नाही म्हणून वीर बाबूराव शेडमाके यांचा बसविलेला पुतळा हटविल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजगी दिसत होती. तक्रार नव्हती परवानगी घेतली नसल्याने पोलीस प्रशासनाच्या आदेशाने पुतळा हटविला असे असतांनाही गावातील काही अती हुशार राजकारणी तेढ निर्माण व्हावा यासाठी विरोधी लोकांवर तक्रार केल्याचा आरोप लावुन समाज बांधवाच्या भावना भडकावून आपली पोळी शेकत होते. यामुळे नांदा येथील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले.

अमरावती येथे पुतळा बसण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आगोदरच नांदा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याकरिता विविध राजकीय पक्षांच्या दोन समित्या अमोरा समोर आलेल्या आहे. कायदा व सुव्यवस्था राखता यावी याकरिता पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नांदा येथील वीर बाबूराव शेडमाके यांचा बसविलेला पुतळा हटविण्यात आला. आता समाज बांधवांना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून शासनाची परवानगी घेऊनच पुतळा बसवावा लागणार आहे. आधीच परवानगी घेतली असती तर बसविलेला पुतळा हटविण्याची नामुश्की मंडळावर आली नसती.

 

परवानगी नसल्याने पुतळा हटविण्याचे निर्देश पुतळा हटवावा अशी कुठलीही तक्रार कोणीही दिली नाही. शासन परवानगी नसल्याने पुतळा हटविण्याचे निर्देश दिले रीतसर शासन परवानगी घेऊन पुतळा बसविला पाहीजे. पुतळा हटविण्याची कारवाई केली गेली नसती तर भविष्यात कोणी कुठेही पुतळे बसवतील अशाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार. यामुळे पोलीसांनी स्वत सज्ञान घेत पुतळा हटविण्याचे निर्देश दिले. समाज बांधवांनी पुतळा हटवून प्रशासनाला सहकार्य केले. यापुढे विना परवानगी पुतळा बसविणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल.”

– सत्यजीत आमले ठाणेदार, पोलिस ठाणे गडचांदूर

 

परवानगी घेणे बंधनकारक नांदा येथे महापुरुषांचा पुतळा बसविण्यासाठी ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारची परवानगी मागण्यात आलेली नाही. पुतळा बसविण्यासाठी परवानगी देण्याचा ग्रामपंचायतला कोणताही अधिकार नसून सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. विविध अटींची पूर्तता केल्यानंतरच जिल्हाधिकारी पुतळा बसविण्यासाठी परवानगी देतात. महापुरुषांचे पुतळे बसविण्याकरीता परवानगी घेणे बंधनकारक आहे.”

दिलीप बैलनवार प्रशासक, ग्रामपंचायत नांदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here