प्रदुषणाच्या गंभीर समस्येबाबत पालकमंत्र्यांचे उर्जा व पर्यावरण मंत्र्यांना पत्र

0
442

प्रदुषणाच्या गंभीर समस्येबाबत पालकमंत्र्यांचे उर्जा व पर्यावरण मंत्र्यांना पत्र

तातडीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर,दि. 10 जानेवारी : जागतिक स्तरावर चंद्रपूर शहराची प्रदूषित शहरांच्या यादीत गणना होत आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने जाहीर केलेल्या क्रमवारीत चंद्रपूर शहर हे राष्ट्रीय स्तरावर सातव्या क्रमांकावर तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. इतर उद्योगाद्वारे शहरात प्रदुषण होत असले तरी सर्वात जास्त प्रदूषण शहरालगत असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. परिपूर्ण पर्यावरणीय निर्देशांक कृती आराखड्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा, प्रमुख भागधारक म्हणून समावेश करण्यात आला असून प्रदूषण कमी करण्याकरीता अधिक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे येथील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाढत्या प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्याबाबत वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे मंडळाकडे असलेल्या रु. 1 कोटी रकमेच्या बँक हमीमधून रु. 40 लक्ष एवढी रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार कोळसा साठा उघड्यावर ठेवल्याबाबत, पाणी फवारणी यंत्रणा बंद असणेबाबत, युनिट क्र. 3 व 7 मधून काळसर धुराचे उत्सर्जन, युनिट क्रमांक 7 च्या चिमणीतून अधिक डस्टचे उत्सर्जन, तेलाचा तवंग असलेले सांडपाणी ईरइ नदीपात्रात दिसणे, वाहतुकीमुळे धूळ उडणे, युनिट क्रमांक 8 व 9 च्या चिमणीतून धुळीचे उत्सर्जन होणे, एलटी बंकरमध्ये धुळ उडणे, चिमणी क्रमांक 4 व 6 मधून अधिक उत्सर्जन दिसणे, कॉल स्टॉक यार्ड मधून निघणारे सांडपाणी रानवेडंली नाल्याद्वारे ईरई नदी मध्ये मिसळणे, अॅश लिकेज, कोल बंकरमध्ये धुळीचे उत्सर्जन, इत्यादी करीता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रास वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली आहे. वाढत्या प्रदूषणासंदर्भाने न्यायालयात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राविरुद्ध विविध याचिका न्यायप्रविष्ट आहेत.

असे असतानासुद्धा, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राद्वारे वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याकरीता कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चंद्रपूर शहर व परिसरातील वातावरण तसेच नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने परिसरातील नागरिकांना गंभीर स्वरूपाचे आजार होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या गंभीर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राद्वारे वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्या करता तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी पत्रात नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here