तालुक्यात रेती चोरीला उधाण ; महसूल विभागाची मुकदर्शक भूमिका संशयास्पद

0
819

तालुक्यात रेती चोरीला उधाण ; महसूल विभागाची मुकदर्शक भूमिका संशयास्पद

 

राजुरा : काही दिवसाअगोदर महसूल प्रशासन राजुरा तर्फे रेती चोरट्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईने धडकी बसलेल्या अट्टल रेती चोरट्यांनी काही दिवस रेतीचा उपसा थांबविला होता. मात्र सध्या महसूल प्रशासन गाफील असल्याची संधी हेरून दिवसाढवळ्या रेतीची चोरटी वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या रेतीच्या चोरीकडे महसूल प्रशासनाचे लक्ष नाही का…? की या अट्टल रेती चोरट्यांना कोणाच्या मेहरबानीने दिवाळी बोनस मिळाला आहे का…? असे एकंदरीत चित्र तालुक्यात आलेल्या रेती चोरीच्या उधाणावरून निर्माण झाला आहे.

“विरुर स्टे. परिसरातील नाल्यात मुबलक उच्च दर्जाच्या रेती साठा डम्पिंग करून रात्रपाळीत चारचाकी हायवाने वाहतूक केली जात असताना महसूल विभाग मुकदर्शक असल्याचे दिसून येत आहे.”

तालुक्यात जंगल भागातून वाहत येणारे नाले पुरेशा प्रमाणात असल्याने दमदार पावसाने उच्च प्रतीचा रेती साठा नाल्यात जमा झाला आहे. या रेतीची चोरी करून पैसा कमविण्याचा मोह स्थानिक ट्रॅक्टर मालकांना अनावर झाल्याने त्यांनी आपला मोर्चा रेतीच्या चोरट्या वाहतुकीकडे वळविला आहे. मात्र महसूल प्रशासन एक-दोन कारवाया करून निर्ढावले असल्याने या रेती चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे.

“रेती तस्करीवर कारवाई करण्यासाठी महसूल अधिकारी यांनी टीम गठीत केली असून लवकरच कारवाई करण्यात येईल”
– श्रीरामवार, तलाठी विरुर स्टे.

तालुक्यातील नाले जणू आंदण मिळाल्याचे चित्र
तालुक्यात असणारे नाले स्थानिक ट्रॅक्टर मालकांना जणू आंदण मिळाल्याचे चित्र दिवसाढवळ्या होत असलेल्या रेती चोरीच्या घटनांवरून दिसून येते. तालुका महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी तसेच महसूल विभागाच्या फिरते पथक नेमके कशात मश्गुल आहे, हे समजणे सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here