आमदार किशोर जोरगेवार यांच्या आंदोलनाला यश, वेकोलि प्रशासन भरणार २११ पदे

0
404

आमदार किशोर जोरगेवार यांच्या आंदोलनाला यश, वेकोलि प्रशासन भरणार २११ पदे

 

 

आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील सिएमडी वेकोलि कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला यश आले असून वेकोलि प्रशासनाच्या वतीने मायनिंग सरदार आणि सर्व्हेयर या पदाच्या 211 जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. अशी जाहिरातही वेकोली प्रशासनाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आली आहे.

मागील तीन वर्षापासून वेकोलिच्या नागपूर विभागाच्या वतीने मायनिंग सरदार या पदाच्या जागा काढण्यात आलेल्या नव्हत्या त्यामूळे मायनिंग सरदारचे महागडे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांवर मोठे संकट कोसळले होते. त्यामूळे वेकोली प्रशासनाच्या वतीने तात्काळ सदर पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात यावी या मागणी करिता आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने ५ जानेवारी २०२१ ला नागपूर येथील वेकोलिच्या सिएमडी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मागणीचा पाठपूरावाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या कडून सातत्याने सुरु होता.

नागपूर वेकोलि विभागात अनेक कोळशाच्या खाणी असुनसुद्धा या ठिकाणी अपेक्षित असा रोजगार स्थानिक युवकांना उपलब्ध झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक कोळश्याच्या खाणी बंद पडल्या आहेत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या युवकांचा रोजगार बुडाला आहे. अश्यातच वेकोलि प्रशासनाकडून २०१८ पासून मायनिंग मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नव्हती. परिणामी मायनिंग अभ्यासक्रमामध्ये पास झालेले हजारो युवक नौकरीच्या प्रतिक्षेत होते. त्यामध्ये त्यांची वयोमर्यादा वाढत चालली होती. उत्तीर्ण असून सूध्दा भरती प्रक्रियेअभावी नौकरीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली होती. हि बाब लक्षात घेता २०१८ पासून प्रलंबित असलेली माईनिंग विभागाचे रिक्त पदे वेकोलीतर्फे भरण्यात यावीत या मागणी करिता आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर येथील वेकोलिच्या सिएमडी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सदर पदे भरण्याचे आश्वासन वेकोलि प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. तसेच तात्काळ वेकोलिच्या वतीने विभागीय २०० हुन अधिक पदे भरली होती. मात्र इतर पदेही हि मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी रेटून धरली होती त्यासाठी त्यांचा वेकोलि प्रशासनासोबत सातत्याने पाठपूरावा सुरु होता. अखेर या पाठपूराव्याला यश आले आहे. वेकोली प्रशासनाने पद भरतीचा निर्णय घेतला असून त्यांच्या वतीने मायनिंग सरदार पदाच्या 167 तर सर्व्हेयर पदाच्या 44 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. याचा मोठा फायदा आता मायनिंगचे प्रशिक्षण घेउन नौकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांना होणार आहे. विशेष म्हणजे या आधीही आमदार किशोर जोरगेवार यांच्या आंदोलना नंतर वेकोली प्रशासनाच्या वतीने मायनिंग सरदार पदाच्या 333 जागा भरण्यात आल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here