जीएमसीच्या विभाग प्रमुखांनी वेळेवर उपस्थित राहून रुग्णसेवा द्यावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

0
568

जीएमसीच्या विभाग प्रमुखांनी वेळेवर उपस्थित राहून रुग्णसेवा द्यावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

सामान्य रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी

सोनाग्राफी मशीनचे उद्धाटन

 

चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे अलिकडच्या काळात स्थापन झाले असून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. येथे आलेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी अतिशय दक्ष राहून रुग्णसेवा द्यावी. तसेच नियमितपणे सकाळी वेळेवर उपस्थित राहावे, अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व विभाग प्रमुखांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, डॉ. कानगावकर आदी उपस्थित होते.

     

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स आणि विभाग प्रमुख मुख्यालयी निवासी राहत नसेल किंवा वेळेवर उपस्थित नसेल तर रुग्णांना चांगली सेवा मिळणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत, याची जाणीव ठेवा. सर्व विभाग प्रमुखांनी सकाळी 8 वाजता रुग्णालयात हजर राहणे गरजेचे आहे. महाविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रयोगशाळा एक महिन्याच्या आत सुरु करण्याचे नियोजन करा. तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी थ्री- डी व्हर्चुअल प्रयोगशाळेचा प्रस्ताव त्वरीत पाठवा, अशा सुचना त्यांनी केल्या.

तत्पूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली असता पालकमंत्री म्हणाले, रुग्णांच्या अनेक तक्रारी असल्यामुळे आज आपण प्रत्यक्ष येऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे. येथे औषधांची मागणी मोठी आहे. यापूर्वी हॉफकीन संस्थेकडून औषधी खरेदी केली जायची. त्यामुळे मागणी केल्यावरसुध्दा सहा-सहा महिने वाट पाहावी लागत होती. आता मात्र स्थानिक स्तरावर जिल्हा नियोजन समिती, खनीज विकास निधी आदीतून औषधी खरेदी करता येते. तसेच येथे आवश्यक असलेल्या मनुष्यबळाबाबत तसेच निधीबाबत सचिवांना सुचना दिल्या आहेत. वाढीव निधी औषधी आणि सर्जीकलसाठी उपयोगात आणला जाईल.

 

औषधांसाठी 8 कोटी 21 लक्ष रुपये पुरवणी मागण्यांमध्ये मागितले असून नवीन खरेदीसाठी अतिरिक्त मागणी केली आहे. येथे अजूनही काही प्रमाणात अडचणी असल्या तरी नवीन अधिष्ठाता रुजू झाल्यापासून 80 टक्के तक्रारी कमी झाल्या आहेत. उर्वरीत 20 टक्के अडचणी त्वरीत सोडविल्या जातील. महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी रोज एक तास सामान्य रुग्णालयाला भेट देऊन औषधींचा साठा किती, पुरवठा किती याबाबत नियमित आढावा घ्यावा, अशा सुचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी त्यांनी रुग्णालयात नव्याने लावण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीनचे उद्धाटन केले.

पालकमंत्र्यांनी अतिदक्षता विभाग, औषधी कक्ष, बाह्यरुग्ण विभागाची पाहणी करून रुग्णांसोबत संवाद साधला. वैद्यकीय महाविद्यालयातील आढावा बैठकीला डॉ. गजभिये, डॉ. अविनाश टेकाडे, डॉ. दिलीप कुमरे, डॉ.चव्हाण, डॉ. सुरपाम, डॉ. सारिका ठाकरे, डॉ. टिपले, डॉ. जांभुळकर, डॉ. परांजपे, डॉ. मामिडवार, डॉ. चेतन नागरेचा, डॉ. सोनारकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here