तेंदूपत्ता संकलन करणारे मजूर व शेतकऱ्यांचे उपविभागीय वन अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी भव्य धरणे आंदोलन

0
556

तेंदूपत्ता संकलन करणारे मजूर व शेतकऱ्यांचे उपविभागीय वन अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी भव्य धरणे आंदोलन

तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना त्वरित बोनस प्रदान करा…!

वन्य प्राण्यापासून शेतपीकांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी उपाययोजना करा

राजुरा तालुक्यातील तेंदूपत्ता संकलन करणारे मजूर व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनातून केली मागणी

 

 

राजुरा, अमोल राऊत (४ ऑक्टो.) : तालुक्यातील तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या तीन वर्षांचा बोनस अद्याप मिळाला नाही. कोरोना महामारीच्या लॉकडाउन मुळे मजुरांची आर्थिक स्थिती बेताची झाली असून पोट भरणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने तेंदूपत्ता बोनस दिला असता तर मजुरांना आर्थिक मदत झाली असती. मात्र मजुरांना २०१९ पासून आजपर्यंत एकूण तीन वर्षांचा बोनस वितरित करण्यात आला नाही. हि परिस्थिती लक्षात घेऊन तेंदूपत्ता बोनस त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी आज उपविभागीय वन अधिकारी राजुरा कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय वन अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.

 

सन २०१९, २०२० व २०२१ या वर्षात राजुरा तालुक्यातील घटक क्र. १६ खांबाळा, १७ राजुरा, १८ विहिरगाव या अंतर्गत येणाऱ्या विविध गावात तेंदूपत्ता संकलनाचे काम करण्यात आले. मात्र सदरील तीन वर्षातील संकलनकर्त्या मजुरांना देण्यात येणारी प्रोत्साहनपर मजुरी (बोनस) अद्याप मिळाली नाही. तेंदूपत्ता संकलन मजुरांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. यामुळे त्वरित हक्काचा बोनस देण्यात यावा. तसेच तालुक्यातील बराचसा भाग जंगलालगत असून शेतीसुद्धा जंगल परिसरालगत आहे. सध्या शेतात कापूस, धान, सोयाबीन, तूर ही पिके आहेत. वन्य प्राण्यांनी शेतात हैदोस घातल्याने शेतपींकांचे अतोनात नुकसान होत असल्याने पीक हाती येण्याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. होणारे शेतपिकांचे नुकसान थांबविण्यासाठी वन विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.

 

एकमुस्त तीन वर्षांचा तेंदूपत्ता संकलन बोनस त्वरित देण्यात यावा. वन्य प्राण्यांपासून होणारे शेतपिकांचे नुकसान थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच वन्य प्राण्यामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत तालुक्यातील मजूर व शेतकऱ्यांनी उपविभागीय वन अधिकारी राजुरा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले. यावेळी प्रदीप बोबडे, ऍड. मारोती कुरवटकर, प्रेमसागर राऊत, लहुजी चहारे, विकास देवाळकर, संतोष अलोने, अरुण डंबारे, बाल्या वांढरे, गुलाब चहारे आदी उपस्थित होते. धरणे आंदोलनात तालुक्यातील शेकडोच्या संख्येने मजूर व शेतकरी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here