बंजारा समाजाची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा! अखिल भारतीय बंजारा युवा सेनेची मागणी

0
839

बंजारा समाजाची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा!

अखिल भारतीय बंजारा युवा सेनेची मागणी

राजुरा, अमोल राऊत । बंजारा समाजातील युवतीच्या मृत्यू प्रकरणात प्रसारमाध्यमे व भाजपच्या पक्ष नेते संपूर्ण समाजाची बदनामी करत आहेत. सदर युवतीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येणार आहे. मात्र प्रसारमाध्यमे व भाजपने सातत्याने सदर युवतीचे फोटो व ऑडिओ क्लिप व्हायरल करून नाहक बदनामी केली आहे. यामुळे युवतीचे चरित्र हनन करून परिवारासह संपूर्ण समाजाची दररोज बदनामी होत आहे. अशाप्रकारे बदनामी करणाऱ्या सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय बंजारा युवा सेना चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष आकाश गुलाब राठोड यांनी निवेदनातून केली आहे. सदर मागणीचे निवेदन ठाणेदार राजुरा यांना देण्यात आले.
या प्रकाराला कंटाळून खुद्द मृतक युवतीच्या वडिलांनी आमची बदनामी थांबवली नाही तर आम्ही संपूर्ण परिवार न्यायालयात जाऊन आत्महत्या करू असे सांगितले. तरीही चरित्र हनन सुरूच आहे. त्यांचे फोटो व विवादित ऑडिओ क्लिपचे प्रसारण करून बदनामीचे षडयंत्र सुरूच आहे. यात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, अतुल भातळकर, चित्रा वाघ, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड या बड्या नेत्यांसह इतर भाजप नेते व काही प्रसार माध्यमातील निवेदकांनीही सरळ सरळ बदनामीची व असंविधानिक भाषा वापरली आहे. अशा गंभीर प्रकरणात न्याय मिळवून देण्याऐवजी संबंधित पीडितेचे चरित्र हनन केले जात आहे. असा आरोप सदर निवेदनातून करण्यात आला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
यामुळे सदर युवतीची बदनामी झाली असून तिच्या परिवाराची आणि संपूर्ण समाजाची सुद्धा बदनामी झाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून तपासात अडथळा निर्माण केला आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली करत एका महिलेची संपूर्ण देशात जाणून बुजून बदनामी केली आहे. अशा नेत्यांवर व चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर गुन्हे दाखल करून योग्य न्याय मिळवून द्यावा. संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here