“तरुणाई झाली स्वच्छता दूत” नोकारी (पाल) येथील युवकांचा ‘ग्राम’ स्वच्छतेसाठी पुढाकार

0
668

“तरुणाई झाली स्वच्छता दूत” नोकारी (पाल) येथील युवकांचा ‘ग्राम’ स्वच्छतेसाठी पुढाकार
आवाळपुर, नितेश शेंडे : आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रकारे आपल्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवायला हवा. त्यासाठी विशेष दक्षता घेतली पाहिजे. ‘स्वच्छ गाव,‘सुंदर गाव’ हे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घेऊ असा निर्धार कोरपना तालुक्यातील नोकारी (पाल ) येथील युवकांनी केला. युवकांकडून गटारांची स्वच्छता करण्यात येते असून नियमितपणे गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गावातील वृद्ध सांगतात की तरुण युवकांनी ग्रामस्वच्छतेचा वसा हातात घेतला असून आता गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या युवकांनी गावातील संपूर्ण गटारे लोकसहभागातून पूर्णपणे साफ केले. यामुळे ग्रामपंचायतच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होताना दिसून येत आहे. गटाराच्या स्वच्छतेमुळे ग्रामपंचायतची जवळपास ५० हजार रुपयांची बचत झाली असून ती रक्कम लोकांच्या आरोग्यावर खर्च करण्यात यावी अशी मागणी गावात ग्रामस्वच्छता राबविणारे युवक सोमा कुळमेथे, रंजन प्रधान, सुरज कन्नाके, लक्ष्मण कन्नाके, गणेश मंडाळी, धनराज सोयाम, विलास मडावी, सुरज मडावी, झित्रु मडावी, विकास कोरांगे, कृतिक कन्नूरवार यांनी ग्रामपंचायतीकडे केला आहे.
आम्ही रस्त्यावर कचरा टाकणार नाही, इतरांना टाकू देणार नाही. कचरा इतरत्र न टाकता कचरापेटीतच टाकू. आमचा गाव, आमचा देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आणि कर्तव्य आमचेच आहे. परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी प्रतिज्ञा या वेळी युवकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here