कटाक्ष:२०२१! हे वर्ष पण असेच राहणार? जयंत माईणकर

0
477

 

कटाक्ष:२०२१! हे वर्ष पण असेच राहणार? जयंत माईणकर

हे असे आहे , पण हे असे असणार नाही
दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही
हे खरे की यांनी घेतले सारेच ठेके
पण उद्या यांच्या चितेवर एकही रडणार नाही

कविवर्य सुरेश भट यांच्या या ओळी ऐकवत अनेक वादविवाद, परिसंवाद स्पर्धा महाविद्यालयीन जीवनात गाजवल्या होत्या. पण आज कोरोनारूपी मृत्यूच्या सावटाखाली २४ मार्चपासून देश लॉकडाऊन नंतर सेमी लॉकडाऊन मध्ये गेले नऊ महीने राहिला. अर्थात २३ मार्चला भाजपने त्यांच्या दृष्टीने अत्यंत ‘महत्त्वाचा’ असलेला मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा शिवराजसिंग चौहान यांचा शपथविधी स्मशानघाईने उरकला होता. आणि त्यानंतर डोक्यात सतत सुरेश भटांच्या कवितेची पहिली ओळ ठेवत वाट पहात राहिलो. वर्ष सरले! एकविसाव्या शतकाचे तिसरे दशक उजाडले! पण परिस्थितीत फारसा बदल घडला नाही.

हे लॉकडाऊन असेच राहिले!
दिवस आपला येईल याची वाट पाहत आम्ही घरीच बसून राहिलो
ठेके कोणी घेतले आम्हाला कळलेच नाही
आमच्या प्रेतयात्रेसाठी २० लोकांची मर्यादा मात्र आली.

ललित कथा, कादंबरी आणि राजकीय लेख यात जरी मी मुक्तपणे संचार करीत असलो तरीही कविता या प्रकारापासून मी दूरच राहिलो. आदरणीय स्व सुरेश भटांची क्षमा मागून त्यांच्या चार ओळी शब्द आणि अर्थसुद्धा बदलून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

कला शाखेचा विद्यार्थी असलेला मी प्रत्येक घटनेचा विचार मात्र केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून करतो. आणि त्यामुळे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणाऱ्या आणि Survival of the fittest” अशी थिअरी मांडणाऱ्या चार्लस डार्विनचा विचार कोरोना काळात मी करण हे क्रमप्राप्तच आहे. परिस्थिती आणि हवामानानुसार पृथ्वीवरील सजीव सृष्टीत बदल घडतो , हा डार्विनचा सिद्धांत! कोरोनामुळे जगात अन्न , वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांच्या पासून अगदी सर्व क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. या नऊ महीन्यात सर्वात चांगले चालणारे व्यवसाय केवळ दोनच आहेत. भाजी, अन्नधान्य पुरवणारी दुकाने आणि मेडिकल शॉप्स! इतर सर्व व्यवसायात केवळ मंदी आली असं नव्हे तर त्या व्यवसायांना स्वतः त बदल करावा लागला.
डॉक्टर्स पीपीई किट घालून बसू लागले. देशाच भविष्य घडविणारे शाळा, महाविद्यालये उघडलेच नाहीत. ऑनलाइन एज्युकेशन हा प्रकार सर्रास सुरू झाला.ज्या मोबाईल पासून मुलांनी दूर राहावं म्हणून आई वडील प्रयत्न करायचे तोच स्मार्ट फोन आई वडील अभ्यासासाठी मुलांना देऊ लागले. हा मोबाईल घेण्यासाठी पालकांकडे दहा विस हजार कुठुन आले असा संघ परिवार स्टाईलचा प्रश्न कोणीही विचारू नये. कारण प्रत्येक मध्यमवर्गीय घरात जेवढ्या व्यक्ती तेवढे स्मार्ट फोन असणं ही काळाची म्हणजेच शिक्षणाची गरज बनली. प्राथमिक शाळेतली मुलं जेव्हा virtual classroom मध्ये आपल्या घरून कॉम्प्युटर किंवा स्मार्ट फोनवर क्लासेस अटेंड करताना पाहिले तेव्हा मला परिस्थितीनुरूप स्वतः त बदल करून घेणाऱ्या मानवाच दर्शन झालं चार्लस डार्विनचा सिद्धांत तंतोतंत लागू पडला. पण मोठ्या शहरात असलेल्या wi fi आदी सुविधा आणि पैसा यामुळे जे बदल सहजगत्या घडू शकले तसेच बदल छोट्या शहरात किंवा अर्ध नागरी किंवा ग्रामीण भागात घडू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच आर्थिक निकषांवर शहरी भारत आणि ग्रामीण भारत हा फरक कायम राहिला. ज्याला शेतकरी संघटनेचे नेते स्व शरद जोशी इंडिया विरुद्ध भारत अस म्हणायचे. रस्त्यावरच्या चहावाल्यापासून (जे काम मोदी करायचे असा त्यांचा दावा आहे)तर भजी तळणाऱ्यापर्यंत (मोदींनी आपल्या मुलाखतीत तरुणांकरिता सांगितलेला व्यवसाय) सर्वच व्यवसाय बंद पडल्याने अशी कामे करणाऱ्या लोकांचे काय हाल झाले असतील याची कल्पना करवत नाही.अनेक खाजगी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने प्राध्यापकांचे पगार खोळंबले आहेत. माध्यम व्यवसायावर झालेला परिणाम मी दोन आठवड्यांपूर्वी लिहीला असल्याने त्याची पुनरुक्ती इथे करत नाही. कार्ल मार्क्सने जगात माणसांच्या केवळ दोन जाती सांगितल्या आहे. त्यातील एक म्हणजे haves (ज्यांच्याकडे सर्व सुखसोयी आहेत) आणि haves not (ज्यांच्याकडे काहीच नाही). कोरोनाच्या काळात आर्थिक निकषांवर आधारित या दोन जाती अधिक स्पष्ट दिसू लागल्या.मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करायचा की रोजच्या जेवणासाठी अस म्हणत मुलांच्या शिक्षणाला तिलांजली देणारे गरीब पालक दिसू लागले. अशा भीषण काळात नऊ महिने तर गेले. मानवाने तोंडावर पट्टी ठेऊन हा सगळा त्रास सहन केला. पण २०२१ मध्ये सुद्धा या परिस्थितीत फारसा बदल होण्याची चिन्ह दिसत नाहीत. लॉकडाऊन शिथिल होत असला तरी परीणामकारक लस जोपर्यंत सर्वाना दिली जात नाही तोपर्यंत सर्व जीवन पूर्ववत होण्याची शक्यता नाही. विद्यार्थ्यांचा २०२१ सालचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. ही परिस्थिती २०२२ पर्यंत तरी सुधरेल का हीसुद्धा शंका आहे. सहा वर्षाच्या* *पंतप्रधानपदाच्या काळात ६० देशांना भेटी देणारे मोदीसुद्धा नऊ महिने देशाबाहेर पडले नाहीत.भलेही त्यांच्यासाठी ८४०० कोटी रुपयांचा विमान याच लॉकडाउनच्या काळात खरेदी केल्या गेलं.
एंटरटेनमेंट विश्वात प्रेक्षकांना प्रवेश न देता कौन बनेगा करोडपती आणि कपिल शर्मा शो यासारखे लाइव्ह कार्यक्रम तयार होऊ लागले. मी स्वतः आठवड्यातुन दोन ते तीन वेळा टिव्ही डिबेट्स मध्ये असतो. कोरोना नंतर स्टुडिओत न जाता मी घरी बसून झूम किंवा गुगल द्वारे चर्चेत भाग घेऊ लागलो.

बाकी परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता नाही. चार्ल्स डार्विनच्या नियमानुसार मानव बहुतेक सगळी कामे घरून करण्यास शिकला आहे.अगदी गरज पडल्यास बाहेर पडणे हे सुरू केलं आहे. गर्दी कमी झाल्यामुळे रियल इस्टेटच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.आणि हळूहळू हे नियम मानवाच्या अंगवळणी पडतील. आणि पुढे डार्विनच्या नियमानुसार तेच बदलेल मानवी जीवन कायम होईल! तूर्तास इतकेच!*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here