करंजीत “विजय” कुणाचा?

0
489

करंजीत “विजय” कुणाचा?

काँग्रेस की शेतकरी संघटना?

पालकमंत्र्याच्या जन्मगावात सरपंचासाठी चूरस वाढली

गोंडपिपरी (प्रतिनिधी) : बहुप्रतीक्षित सरपंच, उपसरपंच निवडीचा अखेर मुहूर्त ठरला आहे. गोंडपिपरी तालुक्यात ह्या निवडी सोमवार (दि.८),मंगळवार (दि.९) आणि बुधवारी (दि.१०) होत आहेत. अशातच आता ग्रामिण भागात राजकीय वातावरण चांगलेच गरम होत असतांनाच राज्याचे मदत पुनर्वसन तथा बहुजन कल्याणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची “जन्मभूमी” असलेल्या करंजी ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता बसेल हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. पालकमंत्र्याच्या जन्मगावात सरपंचासाठी चूरस वाढली असून “विजयाची” माळ काँग्रेस की संघटनेच्या गळ्यात पडते याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

११ सदस्य बलाबल असलेल्या करंजी ग्रामपंचायतीच्या निवडणूकिचा निकाल हाती आला. यात काँग्रेस समर्थित युवा परिवर्तन विकास आघाडीला केवळ ५ उमेदवारांच्या विजयावर समाधान मानावे लागले. तर ६ अपक्षांनी बाजी मारली.या ६ पक्षांमध्ये शेतकरी संघटनेच्या छत्तरसिंग डांगी गटाने मुसंडी मारत २ उमेदवारांसह “गड” राखला.गावकऱ्यांनी पहिल्यांदाच सुशिक्षित आणि युवा उमेदवारांना संधी दिली. परिणामी दिग्गजांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. अशातच २९ जानेवारीला सरपंचाचे आरक्षण पडले. यात करंजीचे सरपंचपद ना.मा.प्र.(स्त्री)साठी आरक्षित निघाले. यामुळे या प्रवर्गाचा उमेदवार असल्याने काँग्रेस आणि शेतकरी संघटनेसाठी नामी संधी मिळाली आहे. मात्र पालकमंत्र्यांच्या गावातच काँग्रेस समर्थित पॕनलला गावकऱ्यांनी नाकारल्याचे चित्र आहे. त्यांना केवळ ५ उमेदवारांचा “विजय” मिळविता आला.तर शेतकरी संघटनेच्या २ उमेदवारांसह ४ स्वतंत्र उमेदवार विजयी झाल्याने आता स्वतंत्र उमेदवारांचे “भाव” वधारले आहेत.अशातच येत्या सोमवार दि.८ फेब्रुवारीला करंजीच्या सरपंच,उपसरपंचांची निवड होणार आहे.यावेळी काँग्रेस अपक्षांचा “हात” हातात घेऊन आपला झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवणार की अपक्षांच्या मदतीने संघटना आपले संघटन वाढवून “गड” मिळविणार,याकडे करंजीसह तालुकावासियांच्या नजरा लागल्या आहेत.एकंदरीत पालकमंत्र्याच्या जन्मगावातील ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची येणार याकडे सार्रांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here