तुमच्या चेहर्यावरील समाधान हेच आमच्यासाठी उर्जास्त्रोत! – देवराव भोंगळे
नारीशक्तीच्या उत्साहात पार पडला गोंडपिपरीत सामुहिक रक्षाबंधन..
गोंडपिपरी, दि. २८
एवढ्या मोठ्या लक्षणीय गर्दीत बसलेली प्रत्येक बहिण ही आता साधीसुधी बहिण राहिली नसून मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली आहे. राज्यातील लाखो गरजू व गोरगरिब बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत असल्याचे पाहून आत्मीय आनंद होतो. मला दररोज विधानसभेतून अनेक बहिणींचे फोन येतात, महायुतीच्या या क्रांतीकारी योजनेबद्दल ते समाधान व्यक्त करतात; तुमच्या चेहर्यावरील समाधानाचे भाव म्हणजे भाजपच्या प्रत्येक तत्पर कार्यकर्त्यासाठी उर्जास्त्रोतच आहे. असे प्रतिपादन आयोजक तथा भाजपचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केले.
भाजपा महिला मोर्चा गोंडपिपरी तथा मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या सामुहिक रक्षाबंधन व महिला सन्मान मेळाव्यात ते बोलत होते.
याठिकाणी जमलेल्या महिला भगिनींनी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना राखी बांधून सामुहिक रक्षाबंधन साजरा केला.
यावेळी तालुक्यातील अनेक युवक व महिलांनी भाजपात जाहीर प्रवेश केला, त्यांचेही देवराव भोंगळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना, लाडकी बहिण योजना देखील कायमस्वरुपी आहे. राज्य सरकारने याकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद केली असून योजनेचा लाभ मिळत राहील. त्यामुळे महिला भगिनींनी विरोधकांच्या फेक नरेटिव्हकडे लक्ष न देता शासनाच्या सर्वच योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा. महिला सक्षमीकरणासाठी आपले महायुती सरकार कटिबद्ध आहे. राज्य सरकारने महिलांसाठी १०८ योजना सुरु केल्या आहेत, या सर्व योजनांची माहिती व लाभ स्थानिक मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन त्याचा जास्तीत जास्त बहिणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी आपल्या संबोधनातून केले.