जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय कार्यान्वित

0
290

जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय कार्यान्वित

चंद्रपूर, दि. 24 : चंद्रपूर जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय (विधी सेवा बचाव पक्ष वकील प्रणाली ) सुरू करण्यात आले आहे. सदर कार्यालय न्यायालयातील तळ मजला, खोली क्र. 14 मध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे.

 काय आहे लोक अभिरक्षक ?

प्रामुख्याने कारागृहात असलेले न्यायबंदी ज्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, त्यामुळे गरीबी व अन्य कारणांमुळे ते खाजगी वकील करू शकत नाही. अशा बंदिवानांकरीता जामीन अर्ज दाखल करणे, त्यांच्या खटल्यात कार्यालयामार्फत प्रतिनिधी पत्र दाखल करणे, त्यांचा खटला चालविणे अशाप्रकारची न्यायालयीन कामे करणे, त्यासोबतच रिमांड कामात देखील गरजूंना मोफत  विधी सेवा देणे, हे सदर कार्यालयाच्या कामाचे स्वरुप आहे.

कोण घेऊ शकतो लाभ ?

 समाजातील महिला, बालक, अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्ती, आपत्तीग्रस्त, जेल व कोठडीतील व्यक्ती, औद्योगिक कामगार, मानसिक दुर्बल, शोषणग्रस्त, वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असलेली व्यक्ती, असे गरजु घटक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक म्हणून अॅड. विनोद बोरसे तर उपमुख्य लोक अभिरक्षक अॅड. वाय. सी. गणवीर, सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. एस. एस. मोहरकर, अॅड. ए. एम. फलके, अॅड. ए. जी. पवार यांची  गरजूंना मोफत विधी सेवा पुरविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रपूर विधी सेवा प्राधिकरणामार्फत लोक अभिरक्षक कार्यालय कार्यान्वीत झाले आहे. कारागृह भेट व पोलीस ठाण्यास भेट देऊन सुट्टीकालीन रिमांड, दैनंदिन रिमांड कामात गरजूंना मोफत विधी सेवा पुरविली जाते. यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भिष्म आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश सुमित जोशी यांचे प्रशासकीय मार्गदर्शन मिळत असते.

 समाजातील वंचित व गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड. विनोद बोरसे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here