विदर्भाच्या जनतेची भावना लक्षात घेत हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे – आ. किशोर जोरगेवार

0
438

विदर्भाच्या जनतेची भावना लक्षात घेत हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे – आ. किशोर जोरगेवार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांना मागणी

 

विदर्भातील प्रश्न ठामपणे मांडता यावेत या करिता 2021 हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात यावे अशी विदर्भातील जनतेची भावना आहे. त्यामुळे जनतेची हि भावना लक्षता घेता पाच आठवड्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांना केली आहे. सदर मागनीचे निवेदनही यावेळी त्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर नगरीत नागपूर करारानुसार दरवर्षी राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन घेतले जाते. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी हिवाळी अधिवेशन २०२० नागपूर येथे घेण्यात आले नाही. मागील पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूरला होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. अधिवेशनाच्या ४५ दिवस आधी नियमानुसार विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होत असते. परंतु असे असतांना अद्यापही बैठक पार न पडल्यामुळे हिवाळी अधिवेशन २०२१ च्या नियत काळ आणि स्थळाबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

विदर्भातील कामगार प्रश्न, उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकऱ्यांची आत्महत्या, रस्त्यांची दुर्दशा, अवकाळी पावसाने झालेली पिकांचे नुकसान, सिंचन, पर्यटन, उद्योग गुंतवणूक, सर्वांगीण विकास असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्व आहे. त्यातच उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा अनुशेष सर्वाधिक आहे आणि ते भरून काढणे आवश्यक आहे.

विदर्भातील जनता दरवर्षी नागपूर अधिवेशनाची आतुरतेने वाट बघत असते. त्यांना राज्याच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या मुंबईकडे दरवेळी प्रवास करणे शक्य नसल्याने नागपूर अधिवेशनात त्यांना आपले प्रश्न मांडता येते. नागपूर करारानुसार काही काळासाठी सरकार नागपुरात आणले जाईल आणि राज्य कायदे मंडळाचे एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात होईल आणि किमान ६ आठवड्याचे विधानसभेचे सत्र नागपुरात होईल असे ठरले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करत तसेच विदर्भातील प्रश्नांना न्याय आणि प्रलंबित कामकाज मार्गी लावण्याकरिता राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २०२१ नागपूर येथे घेण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here