फेक पीएचडी विकण्यासाठी आता निवृत्त न्यायाधीशांचा वापर

0
459

फेक पीएचडी विकण्यासाठी आता निवृत्त न्यायाधीशांचा वापर

स्प्राऊट्स Exclusive

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात बोगस ऑनररी पीएचडी विकण्याचा गोरखधंदा उघडपणे चालू आहे. या धंद्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी आता काही विद्यापीठे चक्क निवृत्त न्यायाधीशांचा गैरवापर करु लागलेली आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने ( एसआयटी ) मिळवलेली आहे.

University of Macaria हे बोगस विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ रशियामधून चालवले जाते, असा विद्यापीठाचा दावा आहे. मात्र या विद्यापीठाच्या जागेवर भलतेच विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने दिलेला संपर्क क्रमांक हा युएसएचा आहे. या विद्यापीठाला भारताची तर सोडा पण रशियाचीही मान्यता नाही, अशी माहितीही ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीला मिळालेली आहे.

या बोगस विद्यापीठाने दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट सेंटर ( India Habitat Center ) येथे १६ ऑक्टोबर २०२२ मध्ये बोगस पीएचडी वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मध्य प्रदेशमधील निवृत्त न्यायाधीश अमन मलिक (Aman Malik ), ऍडव्होकेट रोहित पांडे (Rohit Pandey ) हे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही काही जणांना बोगस पीएचडी वाटण्यात आल्या. पांडे हा ‘सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’चा सहसचिव असल्याचे सांगतो व खुलेआम बोगस पीएचडी विकतो. या भामट्याची सनद त्वरित रद्द करण्यात यायला हवी. मध्यप्रदेशच्या इंदोर येथील ‘कौटिल्य अकेडमी’चे Shridhant Joshi यांच्यासह अनेकांनी या बोगस ‘पीएचडी’चा लाभ घेतला.

‘स्प्राऊट्स’च्या वतीने या गंभीर प्रकरणाची तक्रार युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे चेअरमन एम. जगादेश कुमार यांच्याकडे करण्यात येणार आहे. याशिवाय रशियाच्या दिल्ली येथील एम्बसी व रशियाच्या शिक्षण विभागात तक्रार करुन पाठपुरावा करण्यात येणार आहे.

बोगस ऑनररी पीएचडी वाटताना पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जातो. या हॉटेलमध्ये एखादा मंत्री किंवा लोकप्रतिनिधी आणला जातो व त्याच्या हस्ते बोगस पीएचडी वाटल्या जातात. मध्यंतरी श्री. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कनिष्ठ बंधू प्रल्हाद दामोदरदास मोदी यांच्या हस्ते बोगस पीएचडी वाटल्या, त्याचा पर्दाफाश सर्वप्रथम ‘स्प्राऊट्स’ने केला.

राजभवनात तर बोगस पीएचडी होलसेलमध्ये विकणारे कायमच सत्कार समारंभ करीत असतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियमबाह्य पद्धतीने लादलेले चिटणीस उल्हास मुणगेकर हे या टोळीत सामील आहेत. त्यामुळे बोगस पीएचडी विकणाऱ्या भामटयांना राजभवनाचे दरवाजे सताड उघडे आहेत. या सर्व माध्यमांतून बोगस पीएचडी वाटणारे या विक्रीला कायदेशीर स्वरूप देत आहेत, हे स्पष्ट दिसून येत आहे.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार

सहकार्य: उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here