कृषी साहाय्यक जया व्यवहारे अडकली एसीबीच्या सापळ्यात

0
2694

कृषी साहाय्यक जया व्यवहारे अडकली एसीबीच्या सापळ्यात

राजूरातील तिसरी घटना, राजुरातील अधिकारी व कर्मचारी चिरीमिरीचे ठरत आहे माहेरघर…

 

राजुरा, 5 ऑगस्ट : कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील कृषी साहाय्यक जया व्यवहारे व खाजगी इसम वैभव विजय धोटे यांना एसीबीने लाचेच्या सापळ्यात रंगेहाथ अटक केली आहे. हि राजुरा तालुक्यातील तिसरी घटना असल्याने राजुरातील आणखी काही अधिकारी व कर्मचारी चिरीमिरीच्या नादात एसीबीच्या वादात अडकण्याची खमंग चर्चा वर्तुळात चांगलीच रंगली आहे. यामुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, पोवणी येथील तक्रारदार यांनी आपले सरकार पोर्टल या प्रणालीवर जुने 4 कृषी केंद्र विक्री परवाने अपडेट करून 1 नवीन परवाना काढून व सर्व कृषी केंद्र परवाने स्थलांतर करून देण्याच्या कामाकरिता कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील कृषी सहाय्यक जया विजय व्यवहारे यांनी काल 4 तारखेला 10 हजार रूपयेची मागणी तक्रारदारकडे केली.

या तक्रारीच्या आधारे आज एसीबीने सापळा रचला. कृषी सहाय्यक यांनी सदर लाचेची मागणी राजुरा येथील गणपती कम्युनिकेशन आणि झेरॉक्स सेंटर चालक वैभव धोटे या खाजगी इसमाकडून स्वीकारली. खाजगी इसम वैभव यास एसीबीने रंगेहाथ पकडले. तसेच कृषी सहाय्यक व्यवहारे यांना कृषी अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथील ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही लाप्रवी नागपूरचे पोलीस उपायुक्त तथा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, चंद्रपूरचे उप अधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, पोनी. जितेंद्र गुरनुले सह चंद्रपूर लाप्रवी चमूने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here