देवाड्यात दोघांचा गॅस्ट्रोने मृत्यू ?

0
581

देवाड्यात दोघांचा गॅस्ट्रोने मृत्यू ?

अनेक बाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार

 

राजुरा : राजुरा तालुक्यातील देवाडा येथे दोघांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गावातील आणखी अनेक रुग्ण चंद्रपुरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. लक्ष्मी मारस्कवार व अनिखा शेख यांचा मागील तीन दिवसांत मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या देवाडा गावात दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण झाली आहे. मागील तीन दिवसांत दोन महिलांसह सोमा वारलू शेंडे (५५) यांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. गावातील काही रुग्ण चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, लगतच्या सोंडो गावात सुद्धा गॅस्ट्रोने अनेक जण त्रस्त असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर उपचार न करताच रेफर केले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातही उपचार होत नसल्याने या आजाराची साथ झपाट्याने पसरत असल्याने राजुरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

“ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी पूरवठा योजनेकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने आजार पसरत असल्याची शंका आहे. पाणी शुद्धीकरण व वापरण्यात येणारा ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता यामुळे ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या जीवावर उठल्याचे चित्र असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”

“देवाडा, सोंडो सह टेम्बुरवाही येथे आरोग्य तपासणी कॅम्प लावण्यात आला असून प्रत्यक्ष दररोज गृहभेटी दिल्या जात आहेत.”
डॉ. प्रकाश नगराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here