0
615

चोरी करण्यासाठी इमारतीत घुसला आणि उडी मारून जीव गमावला

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

 

मुंबई: चोरीचा प्रयत्न हा साधारण पहाटेच्या वेळी केला जातो. लोक गाढ झोपेत असताना चोरांचा डाव साधण्याचा प्रयत्न असतो. अशाच एका चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आणि त्यानंतर जे झाले त्याचा कोणीही विचार केला नसेल.

मुंबई शहरातील मरिन ड्राइव्ह परिसरातील वानखेडे स्टेडियमजवळील ‘डी’ रोडवरील एका इमारतीत चोराने प्रवेश केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे नाव रोहित असल्याचे समोर आले. रोहित पहाटे ५च्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहोचला. चोरी करून बाहेर पडण्याआधी वॉचमॅनने त्याला पाहिले आणि संपूर्ण इमारतीलमधील लोकांना गोळा केले. जेव्हा वॉचमॅनने सर्वांना जागे केले तेव्हा तो ३ फूट रुंद कठड्यावर बसला होता. तो इमारतीची ड्रेनेज पाईपलाईनमधून चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचला होता.

इमारतीत चोर घुसल्याची माहिती मिळताच पोलिसांना बोलवण्यात आले. रोहित चौथ्या मजल्यावर अशा ठिकाणी बसला होता जेथे जाणे अवघड होते. त्यामुळे अग्निशमन दल पाचारण करण्यात आले. सर्वांनी त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आणि सुरक्षितपणे बाहेर पडण्यास सांगितले, परंतु रोहितने त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले.

आम्ही जेव्हा तेथे पोहोचलो तेव्हा संबंधित रोहित चौथ्या मजल्याच्या कठड्यावर उभा होता. पावसामुळे पृष्ठभागावर शेवाळ होते आणि तो भाग निसरडा झाला होता. तेथून पाय घसरला तर तो खाली पडू शकतो या शक्यतेने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरीत उतरण्यासाठी जाळी पसरली. हा सर्व प्रकार सकाळी साडे सात म्हणजे दोन तासांहून अधिक काळ चालल, असे नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रातील वरिष्ठ अग्निशमन केंद्र अधिकारी शंकर पोळ यांनी सांगितले.

इमारतीमधील रहिवासी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे खाली उतरण्याची विनंती केली. पण रोहितने जाळी पसरलेल्या ठिकाणी उडी मारण्याऐवजी शेजारी असलेल्या विश्व महल या इमारतीच्या दिशने उडी टाकली. रोहितने २५ फूट लांब उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला तातडीने जेजे रुग्णालयात नेले. मात्र उपचारा दरम्यान दुपारी साडे बारा वाजता त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयात नेत असताना त्याने स्वत:चे नाव रोहित असल्याचे सांगितले. त्याचे वय २६ वर्ष होते आणि तो हिंदी, बंगाली भाषेत बोलत होतो असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. रोहित चोरीच्या उद्देशाने इमारतीत घुसला होता. त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईक सापडेपर्यंत मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here