राजुरा क्षेत्रातील 2 राष्ट्रीय महामार्गांना 2178 कोटी रुपये मंजूर

0
859

राजुरा क्षेत्रातील 2 राष्ट्रीय महामार्गांना 2178 कोटी रुपये मंजूर

दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांचे आ. सुधिर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन…

 

 

राजुरा विधानसभा क्षेत्रातून तेलंगणा राज्यात आसिफाबाद व आदीलाबाद कडे जाणाऱ्या दोन अत्यंत महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गांना केंद्रीय रस्ते, महामार्ग व परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 88 किमी. लांबीच्या या दोन रस्त्यांना 2178.18 कोटी रुपये मंजूर करून अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 5 एप्रिल 2022 ला दिल्ली येथे भेट घेऊन अभिनंदन केले. याप्रसंगी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर हेही उपस्थित होते.

मागील 2 वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गांचे काम सुरु करण्याकरिता निमकर यांनी नितीन गडकरी यांची दि. 21 जानेवारी 2021 रोजी आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारात प्रत्यक्ष भेट घेऊन हे रस्ते राजुरा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता किती महत्वाचे आहे, याची माहिती देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. या दोन महामार्गामुळे या भागातील चित्र बदलुन जलदगतीने विकास होण्यास महत्वाचे ठरणार असल्यामुळे क्षेत्रातील जनतेच्या वतीने केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे महामार्गालागतच्या सर्व गावांना नवं रूप प्राप्त होणार आहे.

याप्रसंगी दिल्ली येथील भेटीत सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार निमकर यांनी याच महामार्गसंबंधी निवेदन देऊन मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. त्यात प्रामुख्याने वर्धा नदीवर बांधण्यात येणारा पूल हा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सस्पेंशन पध्दतीचा (चंद्रपूर येथील ईरई नदीवर) बांधन्यात आलेल्या पुलासारखा बांधून सुशोभीकरण, सौंदर्यीकरण तथा विद्युतीकरण करून हा पूल पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे. याच महामार्गावरील राजुरा लगत होणाऱ्या बायपास रोडच्या पुरबुडीत क्षेत्राच्या भागातून कोतपल्लीवर पेट्रोल पंप ते बामनवाडा रोड पर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. असे न केल्यास राजुरा व परिसरात कृत्रिम पूरस्थिती निर्माण होऊन शेती, मालमत्ता व जीवितहानी होणार आहे ही बाब निदर्शनात आणून दिली. या महामार्गाचे राजुरा शहरातून जाणाऱ्या कोतपल्लीवार पेट्रोल पंप ते जोगापूर प्रवेशद्वार व पंचायत समिती ते रेल्वे पुलापर्यंत द्विभाजकासह रस्त्याचे चौपदरीकरण, विद्यूतिकरण, सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे. तसेच याच महामार्गावर रामपूर ग्राम पंचायत हद्दीत पुलाचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. हा पूल झाल्यास रामपूर परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होणार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. चर्चेत मंत्री महोदयानी निवेदनातील महत्वाच्या समस्या मार्गी लावण्या करिता कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

अधिवेशनानंतर महामार्ग अधिकाऱ्यासमवेत बैठक घेऊन मंजुरी प्रदान करण्यात येईल असे सांगितले. राजुरा क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या परंतु दुर्लक्षित असलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेल्या प्रयत्नांना गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन समस्या सोडवण्याकरिता प्रयत्न केल्याबद्द्ल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे व महामार्गांना निधी उपलब्ध केल्याबद्द्ल दूरदृष्टी ठेऊन विकास साधणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे क्षेत्रातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here