शहरातील दोन डॉक्टरांवर कारवाई

0
1717

शहरातील दोन डॉक्टरांवर कारवाई

उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांचे खाजगी रुग्णालय तर विनापरवाना नर्सिंग होम ला लागले टाळे

 

राजुरा : तालुक्याच्या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून विना परवाना नर्सिंग होम बिनबोभाटपणे सूरु होते. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवाना नसतानाही केवळ आर्थिक लालसेपोटी खाजगी व्यवसाय थाटला होता. याची रितसर तक्रार दिल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किन्नाके व टीमने कारवाई करत दोन्ही रुग्णालयाला टाळे ठोकले असून कारणे दाखवा नोटीस दिला असल्याने शहरातील विना परवाना रुग्णालय चालविणाऱ्यांत चांगलीच धडकी भरली आहे.

शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत सुरू होते विना परवाना नर्सिंग होम
मागील अनेक वर्षांपासून शिवाजी नगर येथे विना परवाना नर्सिंग होम सुरू होते. येथे प्रसूती व उपचार करण्याच्या अनागोंदी व्यवसाय सर्रासपणे सुरू होता. मात्र याची नगरपरिषद विभागाला साधी चुणूक नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथे नर्सिंग होमच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करत रुग्णांना गंडा घालण्यात येत होता. तक्रारीच्या आधारावर येथे कारवाई केली असता विना परवाना सुरू असलेला येथील भोंगळ कारभार लक्षात आल्याने नर्सिंग होमला टाळे ठोकण्यात आले.

कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याचा खाजगी रुग्णालयाचा व्यवसाय
जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या दिनांक 21 मे 2021 च्या पत्रानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय न करणे याबाबत अवगत करण्यात आले आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी आर्थिक हव्यासापोटी खाजगी दवाखाना थाटला. प्राप्त तक्रारीनुसार येथे खाजगी व्यवसाय आढळून आला. यामुळे गडचांदूर रोड वरील उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांचा खाजगी रुग्णालयाला टाळा ठोकण्यात आला असून करणे दाखवा नोटीस देण्यात आला आहे.

उपचाराच्या नावाखाली प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत शहरात खाजगी रुग्णालय व विना परवाना नर्सिंग होम सुरू होते. या गंभीर प्रकरणाची तक्रार तक्रारकर्त्याने केली. या तक्रारीनुसार धाड टाकली असता सर्व काही आलबेल दिसून आल्याने यावर टाळे ठोकण्यात आले. यामुळे शहरातील विना परवाना खाजगी व्यवसाय थाटणाऱ्यांत चांगलीच धडकी भरल्याचे एकंदरीत चित्र पहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here