योग्य वेतना अभावी अंशकालीन (CHB) प्राध्यापकांची परिस्थिती अतिशय बिकट

0
604

योग्य वेतना अभावी अंशकालीन (CHB) प्राध्यापकांची परिस्थिती अतिशय बिकट

 

               महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” आणि या विचारा प्रमाणेच शिक्षणाच्या जोरावर आपला भारत देश आज प्रगतीपथावर पोहोचलेला आहे. शिक्षण अंगणवाडी, बालवाडी ,शाळा , महाविद्यालये, विद्यापीठे या मार्फत पोहोचविले जाते. शिक्षण हे अनेक शैक्षणिक संस्थांमार्फत दिले जाते. शिक्षण घेत असताना व देत असताना अनेक विषयाचे अध्ययन-अध्यापन होत असते. स्वतंत्र विषयासाठी स्वतंत्र शिक्षक असतात. शासनाने शिक्षण देण्याचे कार्य शैक्षणिक संस्थांकडे सोपविलेले आहेत.

 

 

           पदवी तसेच पदव्यूत्तर शिक्षणाचा विचार केल्यास आपणास असे लक्षात येते की हा अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केलेला असतो व इतर महाविद्यालये त्या विद्यापीठांना संलग्न असतात. हे शिक्षण देण्यासाठी अंशकालीन ( CHB) तसेच पूर्णकालीन प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. पूर्णवेळ काम करणाऱ्या नियमित प्राध्यापकांचे वेतन गगनचुंबी असतात. परंतु जे प्राध्यापक अंशकालीन( CHB) तत्वावर काम करतात त्यांचे वेतन मात्र अत्यल्प असतात.

अंशकालीन( CHB) तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना मिळणाऱ्या वेतनामध्ये त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा सुद्धा भागू शकत नाही. विद्यापीठांनी अंशकालीन ( CHB) प्राध्यापकांसाठी प्रत्येक तासिकांना काही निश्चित रक्कम ठरवून दिलेली असते. परंतु अनेक महाविद्यालये विद्यापीठाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा फार कमी रक्कम अंशकालीन( CHB) प्राध्यापकांना देतात.

 

                 काहीवेळा असा प्रश्न पडतो की जेव्हा अंशकालीन( CHB) तसेच पूर्णकालीन नियमित काम करणाऱ्या प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता जवळपास सारखीच असते. मग अंशकालीन प्राध्यापकांना पूर्णकालीन नियमित काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या चौथा भाग तरी वेतन का मिळत नाही.? वर्तमान परिस्थितीचा जर विचार करायचा झालं तर आज महागाई फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामानाने अंशकालीन( CHB) प्राध्यापकांना महिन्याला किमान वेतन कमीत कमी २५०००₹ तरी मिळायला पाहिजे होते. परंतु सध्या परिस्थितीत पाहायला गेलं तर फक्त २००० ते सहा ६००० रुपयांच्या दरम्यान महिन्याला ते मिळतात.

त्यातही बरेच विद्यापीठांनी सेमिस्टर पॅटर्न लागू केल्याने वर्षाला आठ महिने काम व चार महिने रिकामे राहण्याची वेळ अंशकालीन ( CHB) प्राध्यापकांवर आलेली आहे. मिळालेल्या रक्कमेत त्याचा व त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्यामुळे अंशकालीन( CHB) प्राध्यापकांना अध्यापना व्यतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी व पोटाची खडगी भरण्यासाठी अनेक कामे करावी लागतात. उच्च शिक्षण घेऊन देखील रोजगार हमीच्या कामावर जावं लागतं तर कुणी चप्पल जोडप्यांच्या दुकानांमध्ये नोकर म्हणून कामाला असलेले आढळून आलेले आहे. अशी बिकट परिस्थिती अंशकालीन( CHB) प्राध्यापकांवर आलेली आहे.

 

             शासनाने अंशकालीन ( CHB) प्राध्यापकांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काही धोरण आखायला हवेत. त्यांना किमान वेतन कायद्याअंतर्गत योग्य वेतन द्यायला हवे व वेतन देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयावर न टाकता विद्यापीठाने किंवा शासनामार्फत अंशकालीन ( CHB) प्राध्यापकांच्या बँक खात्यात सरळ वेतन पाठवायला पाहिजे. म्हणजे अंशकालीन ( CHB) प्राध्यापकांना शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळण्याची समस्या उद्भवणार नाही. विद्यापीठांनी अंशकालीन (CHB) प्राध्यापकांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला दिला पाहिजे व हा मोबदला अर्धवेळ न देता पूर्ण बाराही महिन्यांसाठी द्यावा म्हणजे अंशकालीन प्राध्यापकांना या व्यतिरिक्त इतर काम करण्याची गरज भासणार नाही व रिकाम्या वेळेत किंवा सुट्ट्यांमध्ये त्याचे संपूर्ण लक्ष अध्यापनामध्ये केंद्रित होईल व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नवीन काही देता येईल का याकडे जातीने लक्ष देईल. यामुळे स्वतःचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल. व नक्किच शिक्षणाचा स्तर उंचावेल.

 

प्रा.सतिश एस. खोब्रागडे

रा. विठ्ठल मंदिर चौक नागभीड

मो.नं. ९४०५५३३४१७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here