कटाक्ष:भक्त, राम मंदिर आणि वस्तुस्थिती ! जयंत माईणकर

0
369

कटाक्ष:भक्त, राम मंदिर आणि वस्तुस्थिती ! जयंत माईणकर

भक्त सध्या सातव्या आस्मानात वावरत आहेत. ४९२ वर्षानंतर त्यांच्या दृष्टीने राम जन्मभूमी असलेल्या जागी रामाच्या मंदिराचं भूमिपूजन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या मते एक हजार वर्षानंतर मोदी रुपाने लाभलेल्या हिंदू शासकाच्या हातून झालं आहे. या मंदिराचे दरवाजे १९८६ साली पंतप्रधान स्व राजीव गांधींनी उघडले होते ,१९८९ ला त्यांच्याच हस्ते शिलान्यास झाला आहे, याच्याकडे ते सध्या सोयीस्करपणे कानाडोळा करत आहेत. मोदी विरोधी कुठलीही गोष्ट ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नाहीत.त्यामुळे डबघाईस आलेली आर्थिक परिस्थिती किंवा कोरोना याविषयी बोलायला तयार नाहीत. आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यास संघाचे दुसरे सरसंघचालक मा सा गोळवलकर आणि सावरकरांचे मोठे बंधू बाबराव यांना कथित रित्या अभिप्रेत असलेली मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेतून देश जात आहे.

We and our Nationhood defined”” या बाबाराव सावरकरांच्या मूळ पुस्तकाच भाषांतर ‘आम्ही कोण’ असे मराठीत गोळवळकरांनी केेल होते. सोशल मीडियावर यावििषयीच्या पोस्ट, क्लिप्स मोठया व्हायरल होत आहेत. त्यातील कथित मजकुराचा गोषवारा पुढीलप्रमाणे. प्रशासनाने आपल्या राज्यातील लोकांचे उत्पन्न किमान ठेवले पाहिजे याची खात्री करुन घेतली पाहिजे. अनेक श्रीमंत नागरिकांना नियंत्रित करणे अवघड आहे, म्हणून संपत्ती एका, दोन किंवा प्रशासकाशी निष्ठावान जास्तीत जास्त तीन लोकांच्या हातात केंद्रित केली पाहिजे. गोळवलकर यांच्या या कथित विचारांची कसोटी पाहता सरकारच्या आर्थिक धोरणांवर बारकाईने नजर टाकली तर देशाचं आर्थिक धोरण त्याच मार्गाने चाललं आहे हे दिसेल.
सत्तेत राहण्यासाठी देशाचा ९५% भाग उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे. या नियमानुसार ९५% देश गरीब झाला व काही सर्वशक्तिमान बनले तर सत्ता सदैव काबीज केली जाऊ शकते. नोटाबंदी, जीएसटी, बँकांचे एनपीए, पीएमसी, सरकारी उपक्रमांची विक्री, नौकर्या संपुष्टात आणणे, दंगली घडवून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणे, संविधान बदलून कमकुवत करणे, देशातून छोटे व्यवसाय हटविणे आणि बँकांचे बुडणे व नासाडी करणे मोबाईल कंपन्यांसह अनेक कंपन्या बंद करण्यास भाग पाडणे हा सर्व त्या कटाचाच भाग आहे. यूएनच्या अहवालानुसार २०१६ ते २०१८ पर्यंत १०९५ श्रीमंत भारतीय भारत सोडून दररोज परदेशात जात आहेत, व काही कोट्यवधी लोकांना परदेशात पाठवले जात आहे. सरकारच्या धोरणांमुळे बरेच उद्योगपती डिफॉल्ट झाले, तर काही उद्योजकांची संपत्ती शंभर पट वाढली. हे गुलाम उद्योगपती, अंबानी, अदानी, रामदेव आणि भाजपाचे अनेक खास लोक मोठे होताना दिसत आहेत. ज्या उद्योगपतींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही त्यांना भारत सोडून जाणे भाग पडले त्यामुळे कोट्यवधी रुपये बुडविणेस त्यांना मदतच झाली. बजाज घराण्याचा मोदी सरकारशी वाद सुरूच आहे. धर्माधिष्ठित उजव्या विचारसरणीचा विजय होत आहे. मंदिराच निर्माण होणार म्हणून आनंदित होणारे सुशिक्षित मध्यम, उच्च मध्यम वर्गीय पाहून हिटलरवर जर्मन लोकांनी टाकलेल्या विश्वासाची आठवण होते. फ्युरर आपल्याला सर्व परिस्थितीतून वाचवेल या जर्मन जनतेच्या विश्वासाला शेवटी तडा गेला तो स्वत: हिटलरच्या आत्महत्येनी. इथे भक्तांच्या विश्वासाला की अंधविश्वाला कधी तडा जाईल याची वाट पाहत आहोत.

तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांची हुकूमशाही दाखवली की भक्त तुम्हाला इंदिराजींची आणीबाणी सांगतील. तुम्ही त्यांना अल्पसंख्याकांच्या होणाऱ्या मॉब लिचिंग बाबत विचाराल तर ते तुम्हाला विस्थापित काश्मिरी पंडितांची आठवण करून देतील. तुम्ही बेरोजगारी बाबत प्रश्न उपस्थित कराल तर ते हिंदुत्वाची झूल पांघरतील. राम मंदिर आणि ट्रिपल तलाक विरोधी कायद्याचे महत्व अधोरेखीत करतील. तुम्ही शेतकरी समस्या आणि दुष्काळाबाबत बोलाल तर ते तुम्हाला सिंचन घोटाळ्याची आठवण करून देतील. तुम्ही डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेबाबत शंका उपस्थित कराल तर ते ५ ट्रीलियन अर्थव्यवस्थेचे गाजर दाखवतील.तुम्हाला धार्मिक सलोख्याची काळजी वाटत असेल तर ते तुम्हाला यापूर्वी हिंदू कसा खतरे में होता हे समजावून सांगतील. आणि हजार वर्षातील एकमेव हिंदू शासक म्हणून मोदींचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला देशातील जनतेच्या मूलभूत गरजा अधिक गरजेच्या वाटत असतील तर ते तुम्हाला हिंदुराष्ट्राचे महत्व पटवून देतील. तुम्हाला गेल्या सहा वर्षांत देशाची झालेली अवस्था चिंतेत टाकत असेल तर ते तुमच्याकडे ७० वर्षांचा हिशोब मागतील. तुम्ही ११९ आमदारांना राजीनामा देण्यासाठी तथाकथित रित्या ३००० कोटी रुपयात खरेदी करण्याचा विषय काढाल तर ते तुम्हाला इंदिरा-राजीव यांच्या काळातील पक्षांतर आणि राज्य सरकारे बरखास्त करण्याच्या घटनांची आठवण करून देतील. देशाची खरी ताकद सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक सलोखा हीच आहे हे असे तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्हाला हिंदुत्व आणि जातिव्यवस्थेचे महत्व पटवून देतील. तुमच्या डोळ्यादेखत गेल्या ७० वर्षांत जनसामान्यांच्या काबाड कष्टातून उभा राहिलेला हा देश विकला जात आहे,भांडवलदारांच्या स्वाधीन होत असताना तुम्हाला वेदना होत असतील तर ते भांडवलदारांचे देशाच्या उभारणीतील योगदान अधोरेखित करतील. स्वतः मोदींनी धंद्यात भांडवल लावणाऱ्या व्यक्तीच्या त्यागाची तुलना देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकाच्या त्यागाशी केली आहे. आणि सहा वर्षात पत्रकारांशी कधीही संवाद न साधणाऱ्या मोदींना त्यांच्या वाक्यविषयी कोणी जाब विचारण्याचा प्रश्नच नाही.

देशाची वाटचाल प्रचंड वेगाने अधोगतिकडे सुरू असली तरी हिंदुत्ववादी मोदी नावाच्या ईश्वरी अवताराच्या ती हातात असल्याने त्यांना त्याचे अजिबातही सोयरसुतक नाही. हिंदुत्व आणि मोदींत्व याचा इतका गोंगाट करावा की विरोधाचा आवाजच क्षीण होऊन जाईल, ही त्यांची रणनीती सध्या तरी चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येत आहे. देशाची आगामी वाटचाल आणि त्याचा मार्ग संघाने आधीच निवडून ठेवलेला आहे, आणि जर २०२४ ला मोदी तिसर्यांदा निवडून आले तर संपूर्ण देश हुकूमशाही प्रणित धर्माधिष्ठित बनलेला असेल. आणि नेहरूंनी घालून दिलेल्या सांसदीय लोकशाहीची ती अखेर असेल.समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता तर नसेलच!तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here