हप्ताखोरीने मोठे मासे गळाबाहेर हातभट्टीवर गुळांबा निर्मिती व सर्रास विक्री

0
814

हप्ताखोरीने मोठे मासे गळाबाहेर

हातभट्टीवर गुळांबा निर्मिती व सर्रास विक्री

राजुरा, अमोल राऊत : विरुर पोलीस स्टेशन ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना बराच ऊत आला असून त्या धंदेवाईकांवर कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. आर्थिक मायेपोटी मुसक्या आवळण्यात पोलीस ठाणेदार सपशेल अपयशी ठरत असल्याचे वास्तववादी चित्र आहे. परिसरात रेशन तांदळाचा काळाबाजार, जनावर तस्करी, रेती तस्करी व देशी-विदेशी दारू तस्करी या अवैध व्यवसायाने चांगलाच जम बसविला आहे. यातील हातभट्टीवरील गावठी दारूचे महाजाळ थोमपूर, मुंडीगेट, बंजारगुडा व विहिरगाव येथे पसरले आहे. हप्ताखोरीमुळे या हातभट्टी धारकांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनसुबे बुलंद झाल्याचे चित्र ठाणे हद्दीत पाहावयास मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विहिरगाव येथे हातभट्टीवर गावठी दारू निर्मितीचा कार्यक्रम रोजचाच सुरु असून त्याकडे पोलीस प्रशासनाचा होत असलेला कानाडोळा व स्थानिक राजकीय नेतेमंडळीची छत्रछाया असल्याची पोचपावतीच समजावी लागेल. शिवाय गावठी दारु बनावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या गुळाचा व्यवसायही चांगलाच जोर धरू लागला आहे. विहिरगाव येथे असलेल्या मोठ्या माशाकडून पोलीस ठाण्यातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना हप्ता जात असल्याने त्या मोठ्या माशांना अडसर ठरणाऱ्या हातभट्टी धारकांवर कारवाईचा बडगा उगारून मोठ्या माशांना जाळाच्या बाहेर ठेवले जात असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
निवडक हातभट्टीधारक यांच्यावर येथील स्थानिक राजकीय सलोखा व पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्याशी मधुर आर्थिक संबंध असल्याने त्यांना खुली सूट दिली जात आहे. यामुळे पोलीस व राजकीय छत्रछाया असलेल्या हातभट्टी धारकांचे धैर्य वाढत चालले आहे. या भेसळ व आरोग्यास धोकादायक असलेल्या हातभट्टीवर जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांनी गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here