वाहतूक नियंत्रण विभागाची वसुली जोमात राजुरा ठाणेदार कोमात कोरोनाच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु अन वाहतूक नियंत्रण विभाग म्हणते आम्ही आमचेच खिसे भरू…

0
899

वाहतूक नियंत्रण विभागाची वसुली जोमात राजुरा ठाणेदार कोमात

कोरोनाच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु अन वाहतूक नियंत्रण विभाग म्हणते आम्ही आमचेच खिसे भरू…

 

राजुरा, अमोल राऊत : ‘वळणे असती रस्त्याला तर वेग वाढविता कशाला’ या म्हणीप्रमाणे वाहतूक नियंत्रण विभागाची चमू पहाटे ६ वाजेपासून शासकीय वाहन घेऊन कर्तव्यावर निष्ठेने वसुलीचा वेग वाढवतानाचे बोलके चित्र पहावयास मिळत आहे.
‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ या ब्रीद वाक्याला छेद देत तालुक्यातील वाहतूक नियंत्रण विभाग भरकटत असल्याचे चित्र मागील १५ दिवसांपासून प्रकर्षाने दिसून येत आहे. महत्वाची गंमत अशी की, सर्व झाल्यावर येणारी पोलीस अशी जनमाणसात प्रतिमा आहे. मात्र येथे याउलटच रोज घडत आहे. राजुरा पोलीस ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखेचे चार कर्मचारी पहाटे ६ वाजेपासून शासकीय वाहन व इंधनाचा गैरवापर करत मॉर्निंग वॉक सारखे गायत्री मंदिर आनंदगुड्याच्या अगोदर असिफाबाद राज्य महामार्गावर ये-जा करणाऱ्या मोठ्या मालवाहक गाड्यांना थांबवून चालकांकडून वसुली करण्याचा गोरखधंदा नित्यनेमाने सुरु आहे. या वसुली बाण्यामुळे ट्रक चालक बरेच धस्तावले आहेत. बिनधास्तपणे कर्तव्याला बगल देऊन वसुली कशी काय केली जाते?हा यक्ष प्रश्न वाहन चालक व जनतेला पडला आहे.
तालुक्यात असलेल्या अवैध दारू, जनावर तस्करी, रेती चोरी, रेशन तांदूळ काळाबाजार व ओव्हरलोडिंग याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात सुद्धा अगोदरच कारकीर्द वादग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांचा भरणा असून खात्याला कलंकित करत निर्लज्जपणाचा कळस गाठल्याचे दिसून येते.
‘ते’ चौघे कर्मचारी शेवटी वसुली करतात तरी कोणासाठी? हा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. नियमबाह्य वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी वाहन चालकांना वेठीस धरत वसुली करण्यावरच नियंत्रण केंद्रित केल्याचे दिसून येते. याबाबत राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार एवढे गाफील कसे राहू शकतात. या वसुली कर्मचाऱ्यांना आवर घालतील का याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. जिथं माणसं श्वास घेण्यासाठी आपल्या आयुष्याची जमापुंजी खर्ची घालत आहेत तिथेच वर्दीतील भ्रष्ट कर्मचारी आपले खिसे भरण्यात मशगुल आहेत. त्यांना सामान्य जनतेशी काहीच सोयरसुतक नसल्याची जणू हि पोच पावतीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here