‘कमिशन वसुली’ बाण्यामुळे विरुर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीत फोफावला अवैध दारूचा व्यवसाय

0
1335

‘कमिशन वसुली’ बाण्यामुळे विरुर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीत फोफावला अवैध दारूचा व्यवसाय

राजुरा, अमोल राऊत : विरुर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना बराच ऊत आला आहे. परिसरात देशी-विदेशी दारू सह गावठी दारूचा महापूर ओसंडून वाहताना दिसून येतो. त्याचप्रमाणे जनावर तस्करी, रेशन तांदळाचा काळाबाजार, रेती तस्करी या अवैध गोरखधंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत. मात्र पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. तेलंगणातून रात्रपाळीत देशी-विदेशी दारूची वाहतूक केली जाते. शिवाय गावठी दारूची तर मुबलक प्रमाणात बिनबोभाट विक्री हा नित्यनेमाने चालणारा अवैध धंदा रेटून केल्या जात आहे. या अवैध धंद्यांना बळ देण्याचे काम कर्तव्याला बगल देत स्वार्थापोटी पोलीस प्रशासनाकडून केल्या जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात चांगलीच रंगली आहे. यामुळे जनतेत ‘ते’ कमिशन वसुली अधिकारी कोण? या शंकेने एकच खळबळ उडाली आहे.
तेलंगणातील दारूची चारचाकी व दुचाकी वाहनाने वाहतूक करून परिसरात पुरवठा केला जातो. हातभट्टीवरील गावठी दारूचे केंद्रही ठाणे हद्दीत जोमात सुरु आहेत. गब्बर देशी-विदेशी दारू तस्करांकडून महिन्याकाठी लाखो रुपयाची माया दिली जात असून हातभट्टीवीरांकडूनही हजारो रुपये दिल्या जात असल्याची माहिती आहे. यामुळे ऐशोआराम व चारचाकी वाहनांच्या हव्यासापोटी रखवालदार मेहरबान झाले की काय ?
पोलीस प्रशासनाच्या ‘कमिशन वसुली’ बाण्यामुळे विरुर स्टेशन ठाणे हद्दीत अवैध धंदेवाईक मालामाल झाले असून शिरजोर ठरत आहेत. ‘कुंपनच शेत खात’ या उक्ती प्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांचे दारू तस्करांशी चिरीमिरीचे संबंध असून कर्तव्याला बाजूला सारत त्यांची पाठराखण करत आहेत. जो दारू तस्कर इतर तस्करांची माहिती देतो त्याला काहीप्रमाणात सूट देण्यात येते अशीही माहिती आहे. यामुळे ‘पोलीस’ या शब्दाची विश्वासहर्त्ततेवरील जनतेचा विश्वास उडाला असून आपल्या वर्दीला कलंकित करून काळा डाग फासण्याचा प्रताप बिनधोकपणे सुरु आहे. पोलीसांच्या हप्ताखोरीने अवैध धंदेवाईकांचे मनोबल वाढले असून हेच तस्कर भविष्यात प्रशासनाला डोईजड होण्याची शंका नाकारता येत नाही.
आर्थिक स्वार्थामुळे दारू तस्करांवर पोलीस प्रशासनाचा अंकुश नसल्याने तस्कर निरंकुश झाल्याचे चित्र आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शासन प्रशासनाकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात असल्याचा संभ्रम जनतेत निर्माण झाला आहे.
‘आमचे कोणीच काही करू शकत नाही’ असे म्हणण्याइतपत तस्करांची मजल गेली आहे. महिन्याकाठी लाखो रुपयांची माया जमवून दारू तस्करीचा बागुलबुवा केला जात असल्याने ‘रक्षकच बनले भक्षक’ याची प्रचिती जतनेला प्रत्यक्ष अनुभवायास मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलून ठोस कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here