असंवेदनशील पोलीस प्रशासनाच्या भूमीकेमुळे अवैध विषारी दारूची तालुक्यात सर्वत्र राजरोसपणे विक्री

0
726

असंवेदनशील पोलीस प्रशासनाच्या भूमीकेमुळे अवैध विषारी दारूची तालुक्यात सर्वत्र राजरोसपणे विक्री

ठोस कारवाई होणार का हा सर्वसामान्य जनतेला पडलेला गहन प्रश्न?

अमोल राऊत, राजुरा (चंद्रपूर) : राजुरा तालुका पूर्वी निजामाच्या राजवटीखाली होता. संपूर्ण देश स्वतंत्र झाला तरी राजूऱ्याला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. कित्येकांच्या त्यागातून व बलिदानातून या तालुक्याला निजामशाहीतून अखेर स्वतंत्र करण्यात आले. अशी ख्याती पूर्ण देशात राजूरा तालुक्याची परिचित आहे. या ख्यातनाम तालुक्याला जर काळिमा फासण्याचे काम जर कुणी करत असेल तर इथल्या मातब्बर राजकारणी लोकांनी व प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी. भ्रष्टाचाराच्या गर्द छायेत सर्व सामान्य जनतेला ढकलण्याचे कार्य फक्त आणि फक्त येथील राजकारणी व प्रशासन मिळून खेळखंडोबा करीत आहेत. असाच एक तालुक्यातील ऐरणीवरचा ज्वलंत, गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे ‘विषारी दारूची’ होणारी खुलेआम विक्री. दारुबंदी ही केवळ शासन प्रशासनाची रोजगार हमी योजना व कागदी वाघ चालवुन स्वतःची धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. दारूविक्री हा तालुक्यातील गंभीर अवैध धंदा न राहता प्राणप्रतिष्ठेचा विषय झाल्याचे दिसून येत आहे. आजघडीला प्रशासकीय व राजकीय मंडळींकडून सामान्य जनतेला बाजूला सारत या अस्सल विषारी दारू विक्रेत्यांचा उदोउदो करण्यात येत असल्याचे सर्वश्रुत आहे. कारण या समाजविघातक कृत्य करणाऱ्यांकडून भ्रष्ट कमाई त्यांच्या खिशात जमा होते. यामुळे विषारी दारूचे रोपटे लक्कडकोट हद्दीपासून सुरु होऊन तालुक्यातील गल्ली-बोळात चांगलेच फोफावू लागले आहे. निसर्गातील एखादा महाकाय वृक्ष एवढ्या झपाट्याने वाढू शकणार नाही त्याउलट विषारी दारू विक्रेत्यांनी गगनभरारी घेतली आहे. जनतेचे आयुष्य उध्वस्त करणारे विषारी दारू विक्रेत्यांना पोलीस प्रशासन व राजकीय पुढारी भ्रष्ट मार्गाने पैसा घेऊन खरे गुन्हेगार ठरले आहेत. इथल्या तस्करांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व राजकीय नेतेमंडळी सोबत मिळून भ्रष्टत्ता वाढीस लावली आहे व तसे त्यांना अभय असल्याचे समजते, मिळणाऱ्या आर्थिक मायेपोटी अवैध विषारी दारू विक्री विरोधात भूमिका घ्यायला पोलीस प्रशासन धजावताना दिसत नाही. या विषारी दारूची कल्पना असूनसुद्धा आहारी गेलेल्या तळीरामांना कोरोना महामारीपेक्षा भारी संकटाचा सामना करावा लागणार आहे. तालुक्याला लाभलेली वनसंपदा, धनसंपदा व ऐतिहासिक नाव आज या विषारी दारूमुळे धुळीस मिळण्याच्या मार्गावर आहे. असंवेदनशील पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे सामान्य जनतेला अकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
‘कितने आदमी थे दारू बेचनेवाले’ साहेब मोजता येई ना तेवढे! असा गब्बर पॅटर्न सुरु असल्याची खमंग चर्चा राजुरा तालुक्यातील सर्वत्र जोमाने सुरु आहे. या विषारी दारू विक्रेत्यांचे धागेदोरे पोलीस प्रशासन व राजकीय पुढारी यांच्यात समवेत जोडले जाऊन खालपासून वरपर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली गेली की दारू तस्कर विक्रीसाठी मोकाट. असा हा ओंघळवाना विषारी दारूचा प्रपंच सुरु आहे. यात काही सोयरसुतक नसल्यासारखे ‘मी नाही त्यातली आणि कळी लावा आतली’ अशी गत झाली आहे. मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. लक्कडकोट, सिद्धेश्वर, देवाडा, येरगव्हाण, सोंडो, वरूर, भेदोडा, रानवेली, विरुर स्टे., सुब्बई, डोंगरगाव, चिंचोली, चनाखा, सातरी, विहिरगाव, बामणवाडा, गोवरी, साखरी, पोवणी, बाबापुर,रामपूर,अहेरी, खामोना संपूर्ण तालुक्यातील चारही जिल्हा परिषद क्षेत्रात राजरोसपणे मोठ्या डौलाने अवैध विषारी दारू विक्री सुरु आहे. त्या-त्या परिसरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व राजकीय मंडळी ‘तेरी भी चूप मेरी चूप’ कबूल… कबूल… कबूल… अशा प्रामाणिक भूमिकेत वावरताना दिसत आहेत.
राजुरा शहरात सोमनाथपुर, रमाबाई वॉर्ड, शिवाजी नगर, बेघर वस्ती, श्रीराम सिटी जवळ, रामपूर, माता मंदिर वॉर्ड, नाका नं.३, सोनिया नगर, इंदिरा नगर, आंबेडकर वॉर्ड,राजीव गांधी चौक सह सर्व वॉर्डात दारू विक्री केली जाते. राजुरा व विरुर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीत अवैध विषारी दारू विक्रीचा महापूर आला आहे. अबकारी विभाग, पोलिस प्रशासन, डीबी विभाग, एलसीबी विभाग हे सर्व विभाग सपशेल फेल ठरल्याचे दिसत आहे. डोळ्यादेखत दारू विक्री होताना सुद्धा पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद दिसून येते. राजकीय जनप्रतिनिधी व प्रशासन इतके दळभद्री झाले आहे का? बघ्याची भूमिका घेणारे पोलीस प्रशासन कोणत्या भस्म्या बाणा मुळे मूर्च्छित पडले आहे? हा यक्ष प्रश्न आहे. खाकी वर्दीतील खाक्या हरपलेला असून अवैध गोरखधंद्यांना आळा घालणारा खाकी वचक पुन्हा नव्याने पाहायला मिळेल का? असा सूर तालुक्यात उमटला आहे.
राजुरा तालुक्यात दारू विक्रेत्यांना चक्क जणू ई-निविदा टेंडर निघाल्याचे चित्र आहे. विषारी दारू विकण्याचा बहुमान कोणाला मिळेल हे दारू तस्करांतूनच ठरविले जाते. अशी खात्रीलायक माहिती आहे. हा बहूमान मिळालेला तस्कर सर्व तालुक्यात दारूचा पूरवठा करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना पगार देतो. लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचे लाखो रुपये मोजून तस्कर बिनधास्त मज्जा मारतो. आणि या दारू सेवनाने आंबटशौकीन रोज तीळ-तीळ मरणाचे दार ठोठावतात. पण मात्र याचे कुणालाच काही सोयरसुतक नाही. पैसा हा मुख्य भूमिकेत प्रामाणिक पणा सिद्ध करत असल्याने कोणाचीही उजर तक्रार केली जात नाही. यात अधिकारी, बिट मेजर, वसुली पथक ‘हम साथ साथ है’ च्या भूमिकेत दिसतात.

जनतेने स्वतः जागरूक राहून विषारी दारूचे सेवन करणे थांबविले पाहिजे. आपण आपल्या आयुष्याशी छापकाटा खेळतोय. या जीवघेण्या धंद्यांत स्वतःला झोकून देणाऱ्यांनी सुद्धा चिंतन करणे गरजेचे आहे. कारण हे विष पैसे कमविण्याच्या नादात एकदिवस त्यांच्याही घरी पोहचेल आणि हे त्यांना कळणार नाही. ‘घोरपड गेल्यावर फडफड’ करण्यापेक्षा वेळीच सावध होणे, हे लक्षात घेणे गरचेचे आहे. प्रशासकीय व राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने निर्ढावलेल्या दारू तस्करांच्या मुसक्या वेळीच आवळाव्या. तस्करांकडून भ्रष्ट स्वरूपात घेतलेल्या विषाने माखलेल्या पैशात किती संसार उध्वस्त होतील, याची जाणीव ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी.
चौकाचौकात, गल्ली-बोळात, पानटपरीवर, घराघरात विषारी दारूची विक्री कोणत्याही शासकीय वचकाला न जुमानता खुलेआम सुरु आहे. कोणत्या मायेखाली खाकी पुरता ढासळून पांगळा कसा झाला? ‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ या ब्रिदवाक्याला शोभेल अशी भूमिका अनुभवायला मिळणार का? हि शंका सर्वसामान्यांत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here