ग्रामविकास आराखड्यात लोकांच्या गरजेला महत्व द्यावे : राहुल कर्डिले
राजु झाडे
चंद्रपूर,दि. 27 नोव्हेबर : ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करतांना स्थानिक गावातील लोकांच्या गरजा लक्षात घेवून प्रत्यक्ष विकासाशी संबंधीत कामांचा आराखड्यात समावेश करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील खातेप्रमुखांना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद खातेप्रमुख, राज्य शासनाच्या विभागांचे जिल्हास्तरीय विभागप्रमुख व जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचे ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीचे एक दिवसीय प्रशिक्षण काल चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले बोलत होते. कार्यशाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) कपीलनाथ कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अविनाश बांगडे, ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता गिरीश बारसागडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, जि.प.चे कॅफो अशोक मानकर शिक्षण विभागाचे उल्हास नरड, अरूण काकडे, श्री रत्नपारखी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले यांनी पुढे बोलतांना सांगितले की कमी खर्चात अधिक परिणाम देणाऱ्या उपक्रमांचा विकास आराखड्यात समावेश असावा. यात 100 टक्के लसीकरण, स्वच्छ व कचरा विरहीत ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडीमध्ये 100 टकके पट नोंदणी व उपस्थिती, गावातील सर्व क्षेत्र पिकाखाली आणणे, शोषखड्ड्यांचा व परसबागांचा वापर करून गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, स्वच्छतागृह व शौचालयांच्या वापराबाबत जाणीव जागृती करणे इ. कामे तसेच शिक्षण, आरोग्य व उपजीविका या मानव विकास निर्देशांक वाढविणाऱ्या बाबींवर देखील भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गावाच्या विकासासाठी इतर विभागाच्या योजनांसोबत सांगड घालून सर्वसमावेशक विकास आराखडा तयार व्हावा म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कपीलनाथ कलोडे यांनी प्रास्ताविकेतून केली.
यावेळी यशदा येथील चमूने उपस्थितांना सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाला विविध विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.