ते आरोप तथ्यहीन व बिनबुडाचे 

0
408

पद्मगिरीवार ॲन्ड कंपनी ” चे आरोप तथ्यहीन व बिनबुडाचे 

कार्यकर्त्यांच्या राजीनामास्त्रावर अध्यक्ष कुंदावारांचा पलटवार 

 

सलग १५ वर्षे ओमेश्वर पद्मगिरीवार काॅन्ग्रेस तालुकाअध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांच्यानंतर जानेवारी २०१९ ला कवडू कुंदावारांची तालुका अध्यक्ष पदावर वर्णी लागली. तालुका काॅन्ग्रेस मधील जेष्ट व अनुभवी कार्यकर्ता म्हणून ओमेश्वर पद्मगिरीवारांचा अनुभव पक्षाला उभारी देणारा ठरेल, असे वाटत असतांना ती अपेक्षा फोल ठरली. कवडू कुंदावार अध्यक्षपदी आरूढ झाल्यापासूनच तालुक्यात काॅन्ग्रेस मध्ये उंदरा-मांजराचा खेळ सुरू झाला,अन् पक्षाला गटा-तटाच्या राजकारणाची नामुष्की पत्करावी लागली. वर्षाचा कालावधी लोटून गेलाय परंतु या दोघांमधील विळ्या-भोपळ्याचे सौख्य अजूनही कायम असल्याचे एकंदरीत अंतर्गत कारवायावरून दिसते.

१ नोव्हेंबर ला ‘ कुंदावार हटाव, काॅन्ग्रेस बचाव ‘ चा नारा दिल्यानंतर तो प्रसंग तालुकाअध्यक्ष कवडू कुंदावारांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. सामुहिक राजीनामे ही पोकळ धमकी असुन त्याला मुळीच भिक घालायची नाही असाच काही प्रण कुंदावारांचा दिसून आला. माजी तालुकाध्यक्षाने केलेले आरोप तथ्यहीन व बिनबुडाचे असल्याचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा करीत त्यांनी पद्मगिरीवारांना पक्षासाठी काम करून योगदान देण्याचा सल्ला दिला आहे. आता या आवाहनाला किती प्रतिसाद मिळते, ते येणारी परिस्थितीच साक्ष राहणार असून, पक्षात उभी फुट न पडण्याचीच मानसिकता कुंदावारांनी बोलुन दाखवली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुंदावार म्हणतात, जेव्हा पासून मी पोंभूर्णा तालुका काॅन्ग्रेसचा कारभार हाती घेतला, तेंव्हापासुन तालुक्यातील काॅन्ग्रेस कार्यकर्त्यांशी समन्वय साधून, पक्षाची मोट बांधून पक्ष वाढीसाठी व बळकटीकरणासाठी सदोदित प्रयत्न केला आहे. माझ्याकडे अध्यक्ष पदाचा कार्यभार आल्यानंतर लगेचच लोकसभेची निवडणूक लागली. मी अहोरात्र मेहनत करून, तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना हाताशी धरून, पोंभूर्णा तालुका तत्कालीन पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला असतांना सुध्दा खासदार बाळू धानोरकरांना मताची आघाडी मिळवून दिलेली आहे. सर्वसामान्य जनतेची कामे करीत तालुक्यात पायाभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी सतत संपर्कात राहून तालुक्याचा विकास साधण्याचा भरकस प्रयत्न केलेला आहे.

त्याचप्रमाणे शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्याकरिता बैलबंडी सह रॅली काढून तालुक्यात स्वाक्षरी मोहीम राबविली आहे. असे असताना माजी अध्यक्षाने बिनबुडाचे आरोप करून, विरोधकाला हाताशी धरून पदावरून हटविण्याची भाषा बोलने उचित नाही. ते स्वतः १५ वर्षे अध्यक्ष असतांना पक्षहित लक्षात घेत वरिष्ठांनी दखल घ्यावे असे कोणतेही काम केलेले नाही. फक्त सत्ताधाऱ्याशी जवळीक साधून वैयक्तिक हितच जोपासले आहे. पक्ष वाढीसाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळेच त्यांना वरिष्ठ पातळीवरून अध्यक्ष पदावरून पायउतार केले आहे. सध्या काॅन्ग्रेस पक्षाचे समांतर कार्यालय उघडून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी राबविला आहे. त्यांच्या या उपद्रवाला वैतागूनच त्यांना पक्षातून निष्कासित करण्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.

आज घडीला त्यांची स्थिती केविलवाणी असुन विरोधकांना हाताशी धरून त्यांनी उपद्रवी कारवाया सुरू केलेल्या आहेत. १ नोव्हेंबरची बैठक कार्यकर्त्यांची दिशाभूल करूनच आयोजित करण्यात आली होती. माझे पक्षांतर्गत कार्य पाहूच त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली असून, काॅन्ग्रेस पक्षात शुन्य अस्तित्व राहील या भितीपोटी त्यांची केविलवाणी धडपड असल्याचे म्हणत काॅन्ग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी यावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे. काॅन्ग्रेस पक्ष हा समुद्रासारखा अफाट असुन तळागाळातील असंख्य कार्यकर्ते एकनिष्ठ राहुन काम करीत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here