अमृतगुडा वासियांची पाण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण…
दोषींवर कारवाई करण्याची ग्रामपंचायत सदस्य यांची मागणी
विरुर स्टेशन, २२ मार्च :- राजुरा तालुक्याच्या टोकाला व तेलंगणा सीमेजवळ असलेल्या अंतरगाव येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. सदरची घटना आज दुपारी अमृतगुडा येथे घडल्याची माहिती आहे.
गेल्या एक वर्षापासून गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे अजूनही पूर्णत्वास आले नाही. या कंत्राटदारावर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची विशेष मेहरबानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या उन्ह्याळ्याची सर्वात झाली असून घराच्या नळाला पाणी येणे आवश्यक आहे. मात्र या अंतरगाव, अन्नुर, अमृतगुडा गावात नवीन पाण्याच्या टाकीचे अर्धवट असून जुन्या टाकीचे मिळणारे पाणीही ग्रामपंचायत प्रशासनाने बंद केले आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लाठीकाठीने निर्दोष असलेल्या सदस्याला अंतरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अमृतगुडा येथे अकारण चोप दिला असल्याची माहिती आहे.
वारंवार अतिशय गंभीर व जीवनावश्यक असलेली पाणी समस्या मार्गी लावण्याचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही यावर उपाययोजना करण्यात आली नसल्याचे सदस्य निलेश खोब्रागडे यांनी प्रतीनिधिशी बोलतांना सांगितले.
अमृतगुडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईन हे काम मंजूर झालेले असून काम कासवगतीने होत असल्याने जवळपास तीस घरांच्या वस्तीत पाण्याची टंचाई आहे. येथील लोक पाण्यासाठी नदी व नाल्याकडे वणवण भटकत असून संतप्त नागरिकांकडून ग्राम पंचायत सदस्याला जबाबदार समजून मारहाण करण्यात आली. सदर बाबीला ग्रामपंचायत सदस्य जबाबदार नसून जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर शासनाने तातडीने कार्यवाहीचा बडगा उगारावा अशी मागणी विद्यमान सदस्य तथा माजी सरपंच दशरथ कन्नाके यांनी केली आहे.