नाट्य कलावंतांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी देणार – आ. किशोर जोरगेवार
राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक हक्कामुळेच टोपल्या विकणाऱ्या आईंचा मुलगा मुंबईच्या सर्वोच्च सभागृहात पोहचू शकला. आज त्यांच्यामुळे मला वाटपाचा अधिकार मिळाला आहे. याचा उपयोग सर्वसामान्य आणि बहुजनांच्या कल्याणासाठी करायचा आहे. दिक्षाभूमी येथे अभ्यासिकेसाठी आपण १ करोड रुपये उपलब्ध करून दिले असून नाट्य कलावंतांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी देणार अशी घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
लोकजागृती संस्था तथा जयभीम संमेलन समिती, चंद्रपूर द्वारा प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात प्रथम राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर, सिद्धार्थ हत्ती अंभोरे, अनिरुद्ध वनकर, प्रा. इसादास भडके,. रावसाहेब कसबे, अश्विनी खोब्रागडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पावलाने स्पर्श झालेल्या चंद्रपूर येथून राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलनाची सुरुवात होत आहे. हि आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. नागपूर नंतर चंद्रपुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली. त्यांनी दीक्षा दिलेल्या दिक्षाभुमिचा सर्वसमावेश विकास व्हावा यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. पाहिल्यास अधिवेशनात आपण या दिक्षाभूमिच्या विकासासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावाही आपल्या वतीने सातत्याने सुरु आहे. नुकताच येथिल अभ्यासिकेसाठी आपण एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजनही संपन्न झाले आहे. या अभ्यासिकेत १ लक्ष पुस्तकांचा संग्रह असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याला ७५ कोटी रुपयांचा निधी लागणार असून त्यासाठीही आपले प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले. अनिरुद्ध वनकर हे बहुजन शक्ती एकत्रित करण्याचे काम कारत आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा असून यात शक्य ती मदत करण्याची तयारी असल्याचेही यावेळी बोलताना ते म्हणाले. त्यांच्या राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलनाच्या संकल्पनेतून साहित्य क्षेत्राला नवी उंची मिळणार आहे. कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. चंद्रपुरातून सुरु होणारी परंपरा पुढे जात असते. या साहित्य संमेलनाची सुरवातही चंद्रपुरातून होत आहे. त्यामुळे या संमेलनालाही राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. कलावंतांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी येथे करण्यात आली. हि मागणी अतिशय रास्त असून कलावंतांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी २५ लक्ष रुपये देणार अशी घोषणाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. सोबतच चंद्रपूर. गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्हातील झाडीपट्टी कलावंताना वाजवी दरात नाट्य प्रयोग सादर करता यावे यासाठी खुले मंच उभारण्यात यावे हि मागणीही आपण केली असून त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतांचे गायन करण्यात आले या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.