“तो” दुर्मिळ जातीचा साप गेला कुठे ? ; वनविभागाला अपयश
आनंदराव देठे

राजुरा/विरुर स्टे. (17 ऑक्टो.) । राजुरा तालुक्यातील विरुर स्टे. वनपरिक्षेत्र परिसरातील कविटपेठ येथील शेतशिवारालगत मुख्य रस्त्यावर आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास अज्ञातांकडून दुर्मिळ मालवण (मांडूळ) साप पकडून नेल्याची घटना उघडकीस आली. “तो” दुर्मिळ मालवण साप वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला नाही. यामुळे “तो” साप गेला कुठे असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, विरुर स्टे. कडून चिंचोली (बु.) कडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मालवाहक पिकअप चालकाला रस्त्यावर दुर्मिळ मालवण साप दिसला. त्यांनी तत्परतेने “त्या” सापाला पिशवीत बंद केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कविटपेठ येथील नागरिकांना वनविभागाच्या स्वाधीन करण्याचे सांगून तो साप घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. मात्र “तो” दुर्मिळ साप वनविभागाच्या स्वाधीन केला नाही, यामुळे एकच गोंधळ उडाला असून “तो” दुर्मिळ साप गेला कुठे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. याची माहिती तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही देण्यात आली. मात्र त्या सापला पकडणाऱ्यांना व त्या दुर्मिळ सापाचा शोध लावण्यात वनविभागाला अपयश आले आहे. यामुळे विविध प्रश्नांना उधाण आले आहे. “त्या” सापाची तस्करी तर करण्यात आली नाही ना? असा संशय जनतेत निर्माण झाला आहे.