दर्जेदार सादरीकरणाने काव्यमय प्रबोधन संध्येची काव्यमैफिल रंगली

682

दर्जेदार सादरीकरणाने काव्यमय प्रबोधन संध्येची काव्यमैफिल रंगली

मुलींच्या कुंडलीत पुस्तके लिहिण्याचे काम सावित्रीबाईंनी केले – कवी इंजी. अनंत राऊत

अफाट जनसमुदायाने तब्बल दोन तास प्रत्येक कवितेला दिली दाद

राजुरा : आजच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळत नाही. तरुण पिढीने थोर समाज सुधारकांचा आदर्श जपला पाहिजे. आता मुलींचा काळ आला आहे. पोरांनी सावध झालं पाहिजे. समाजाने स्त्री आणि पुरुषांच्या कामात विभागणी केली आहे, यात जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत स्त्री पुरुष समानता येणार नाही. स्त्री सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी वडाला फेऱ्या मारते तर पुरुष हा तमाशातील फडाला शिट्ट्या मारतो. स्त्रीचं कर्तुत्व अफाट आहे. जगण्यासाठी प्रत्येकाला पहिला ठोका आईच्या काळजातून उधार घ्यावा लागतो. मुलींच्या कुंडलिक पुस्तके लिहिण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. बापाने मुलांना माणूस म्हणून जगणे शिकवले पाहिजे नाहीतर तोच पापाचा भागीदार होईल. तीच कविता खरी जी समाजाचे प्रबोधन, जगण्याला बळ देत असेल.

पुरस्काराखाली माझी कविता दबली नाही. जिवंत देव कोणी असेल तर ती आपली आई असे सुप्रसिद्ध कवी, गझलकार अनंत राऊत (अकोला) यांनी सांगितले. ते शहरातील नागवंश युथ फोर्सच्या राजुरा येथे आयोजित काव्यमय प्रबोधन संध्याच्या निमित्ताने बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कविता डोक्यातून येत नाही त्या काळजातून जन्म घेतात. समाजाच्या वेदनेतून कवी कविता करतो. कवीला मरण नसते. आजच्या राजकारणाला धर्मांधाची आग लागली असून यात माणुसकीचा बळी जात आहे. समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घ्यायचे होते. आपण त्यांना डोक्यावर घेतले. भोंगा कविता सादर करून सध्याची राजकीय स्थिती कथन केली. लोकशाही, धर्म संकटात नसून राजकारणाची खुर्ची धोक्यात आहे. दुःखाच्या नादी लागू नका आनंदात रहा. चांगले मित्र जोडा असा सल्ला देत त्यांनी दोन तास श्रोत्यांना खिळवून ठेवलं. त्यांच्या लयबद्ध कविता आणि आवाजाने शेकडो रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी (पं) चंद्रपूरचे भूषण फुसे, सह उद्घाटक आनंदराव अंगलवार, विशेष अतिथी संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर पांडुरंग जाधव, प्रमुख अतिथी जिल्हा शल्यचिकित्सक चंद्रपूर डॉ. बंडू रामटेके, बालरोग तज्ञ राजुरा डॉ. संदीप बांबोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण चंद्रपूर गजानन इंगळे हे सर्व उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक अमोल राऊत यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रणित झाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र फुसाटे, रविकिरण बावणे, रवी झाडे, धनराज उमरे, नूतन ब्राह्मणे, आशिष करमरकर निखिल वनकर, युवराज कातकर, राहुल अंबादे, आकाश वाटेकर, जय खोब्रागडे, प्रमोद देठे, नितीन नगराळे, अनिकेत साळवे, प्रीतम शंभरकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.

advt