सांस्कृतिक कार्यक्रमांमधून समाज आणि माणसं जोडण्याचे समाधान लाभते

237

सांस्कृतिक कार्यक्रमांमधून समाज आणि माणसं जोडण्याचे समाधान लाभते

वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

घुग्घूस येथे भव्य सांस्कृतिक महिला महोत्सवात सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येतो. त्यात जात- वर्ण, गरीब – श्रीमंत, लहान मोठे, शिक्षित – उच्चशिक्षित असा कोणताही भेद मनात न ठेवता आनंद घेतला जातो.  त्यामुळे अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून समाज आणि माणसं जोडण्याचे समाधान लाभते, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी प्रयास सभागृह केमिकल नगर,घुग्घूस येथे भव्य सांस्कृतिक महिला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.  मकरसंक्रात उत्सव व सांस्कृतिक महिला संम्मेलनात विशेष अतिथी म्हणून सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, लॉयड्स मेटलचे व्यवस्थापक संजय कुमार, उपाध्यक्ष पवन मेश्राम, वेकोलीचे सीजीएम आभा सिंग, विवेक बोढे, नामदेव डाहुले, महिला मोर्चा अध्यक्ष अल्काताई आत्राम, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष देवतळे, माजी उपमहापौर राहुल पावडे, पोंभुर्णा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

महिला भगिनींच्या चेहऱ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत हास्य कायम राहाव्या, अशा कामना सुधीर भाऊंनी देवी माता महाकालीच्या चरणी केल्या.

पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा परिसर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये येतो. या मतदारसंघात निवडणूक लढताना या भागातील जनतेने प्रेम दिले, आशीर्वाद दिले. या शहरामध्ये जलतरण तलाव, सभागृह, स्वर्गरथ, असो की इतर कोणतेही कामे पूर्ण करण्यासाठी ताकतीने पाठीशी राहू, असा विश्वास दिला.

जगण्याची तीन पानं असतात. जन्म आणि मृत्यूचं पान आपल्या हाती नाही. पण, कर्माच पान आपल्या हाती असतं. त्यामुळे जगायच कसं आपण ठरवायचे आहे. जगताना दुःख सहन करत की चिंता बाजूला सारत आनंदाने जगायचे, हे आपल्याला ठरवायचे आहे, असा सल्ला सर्व भगिनींना मकर संक्रांतीच्या निमित्ताने भाऊ म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी शहरातील आणि लगतच्या खेड्यापाड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

advt