‘राजस्थानातील जलोर येथील त्या नराधम शिक्षकाला फाशी द्या!’

0
369

‘राजस्थानातील जलोर येथील त्या नराधम शिक्षकाला फाशी द्या!’

अ.भा. रिपब्लिक पक्षाच्या वतीने निदर्शने…

 

चंद्रपूर, राज जुनघरे
एकीकडे संपूर्ण देश अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याचा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतांना दुसरीकडे धर्मांधतेने ग्रासलेल्या एका शिक्षकाने इंद्रकुमार मेघवाल या तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अत्यंत होतकरू व गुणी विद्यार्थ्याला माठातील पाणी प्यायला घेतल्यामुळे अमानुष मारहाण करण्यात केली आणि त्यात या निष्पाप मुलाचा कानाची नस फाटल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला.पिण्याच्या पाण्यावरून इंद्रकुमार जातीयवादाचा बळी ठरला.

या घटनेचा निषेध करत समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा, शतकोत्तर जयंती महोत्सव समितीआणि अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बाळू खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली जातीअंध शिक्षकाला फाशी द्या या मागणीसाठी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्या जवळ तीव्र निदर्शने करत माननीय उप जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.आरोपीला फाशीची शिक्षा द्या, तसेच त्या शाळेची मान्यता रद्द करा या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण होऊनही अजूनही जातिव्यवस्थेची कीड मनुवादी विचारसरणीच्या लोकांच्या मनातून गेलेली नाही हे राजस्थानच्या जालौर येथील घटनेवरून दिसून येते. माठातून पाणी पिण्याच्या कारणावरून एका दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम व अमानुष मारहाण केली त्यामुळे त्या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून याला जबाबदार सध्याची राजकीय व्यवस्था, जातीयवादी मानसिकता व तेथील संबंधित प्रशासन आहे. संबंधित शिक्षण संस्थेत दलितांना पिण्याचे पाणी वेगळे व सवर्णांना पिण्याचे पाणी वेगळे अशी व्यवस्था करून ठेवली होती. तरीसुद्धा तेथील अधिकारी, जिल्हाधिकारी, संबंधित शिक्षण संस्थेचे पदाधिकारी हे सुद्धा तितकेच दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी राजू खोब्रागडे, विशाल अलोणे, प्रेमदास बोरकर, जवादे सर, मृणाल कांबळे, निर्मला नगराळे, गीताताई रामटेके, प्रतीक डोर्लीकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here