कटाक्ष:तरच२०२४ ची निवडणूक चुरशीची होईल! जयंत माईणकर

0
446

कटाक्ष:तरच२०२४ ची निवडणूक चुरशीची होईल! जयंत माईणकर

भाजपने राम मंदिराचे भूमिपूजन करून आणि काश्मीर मधील ३७० कलम हटवून देशातील १०० कोटी हिंदूंपैकी एका मोठ्या वर्गाच्या मनात स्थान मिळवले आहे. ‘२०१४ पासून दिल्या जाणाऱ्या मोदी है तो मुमकीन है’ यासारख्या घोषणांनी. पुलवामा, उरी यासारख्या ऐन निवडणुकीच्या आधी तथाकथित रित्या घडलेल्या अथवा घडवलेल्या घटनांनी! अर्थात या दोन घटनांनी नोटबंदी आणि जीएसटी यामुळे सामान्य माणसांच्या जीवनाची होणारी आर्थिक परवड आणि हलाखीच्या परिस्थितीचे परिणाम निवडणुकीच्या निकालापूरते का होईना दबल्या गेले.
आज कोरोनामुळे आणि आर्थिक चुकांमुळे देशाचा जीडीपी उणे 23 पर्यंत पोचला असताना आर्थिक स्थिरतेसाठी तरी मोदींना सत्तेपासून दूर करण्याचा विचार होत आहे. भारतीय जनता १९९१ पासून एफडीआय मुळे आर्थिक सुबत्ता अनुभवत असताना जनतेला माठातील पाणी प्या असा विचित्र सल्ला देणाऱ्या मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर देशाच्या आर्थिक परिस्थितीचे, देशाच्या सेक्युलारीझमचे आणि पर्यायाने लोकशाहीचे दिवाळेच वाजलेले असेल. हिटलर १२ वर्षे सत्तेवर होता. ज्यू लोकांविरुद्धच्या हिंसक घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या तो सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षांनी. आणि त्याच्या हातून जर्मन जनतेला ज्याचे परिणाम कित्येक वर्षे भोगावे लागले अशा चुका घडल्या त्याच्या शेवटच्या काळात. ही क्रमवारी यासाठी देत आहे की कुठेतरी आपणही याच मार्गाने जात आहोत याची जाणीव सतत होत राहते. जर्मन जनतेच्या किंवा ट्यूटन वंशाच्या श्रेष्ठतेचा नगारा वाजवत हिटलर सत्तेवर आला होता. ज्यू लोकांच्या विषयी त्यानी आम जर्मन जनतेच्या मनात द्वेषभावना पसरविली. रेडिओवर भाषण देताना सतत मी या शब्दाचा वापर करणारा आणि पत्रकारांना आपल्यापासून दूर ठेवणाऱ्या हिटलरकडे पाहताना आपल्या देशात तर त्याची पुनरावृत्ती होत नाही ना याची शंका येते. मोदींना सत्तेवर येऊन सहा वर्षे झाली आहेत.अजून चार वर्षे ते नक्कीच सत्तेवर राहणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या स्थापनेला २०२५ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. केवळ सहा वर्षात देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे दिवाळे वाजवणार्या संघप्रणित भाजपला पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर तिसऱ्यांदा
बहुमत मिळाले तर ते देशाच्या सेक्युलर भूमिलेला, लोकशाहीला ,आर्थिक व्यवस्थेला फार घातक असेल.
पण एक वास्तविकता आपण स्वीकारलीच पाहिजे की हिंदुत्वाच्या लाटेवर आरूढ झालेल्या भाजपला रोखण्याची ताकद कोणत्याही एका पक्षात नाही.त्यामुळे १९८९ पासून २०१४ पर्यंत ज्या संयुक्त सरकारचं अस्तित्व देशात होत, त्याच प्रकारे सर्व भाजपविरोधी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व म्हणजे ५४३ जागांवर एकास एक लढतीचा फॉर्म्युला वापरला तरच काही प्रमाणात शक्य आहे. वास्तविक पाहता काँग्रेस आणि विखुरलेल्या समाजवादी पक्षाच्या विचारधारेत फारसा फरक नाही. फरक असेल तर तो फक्त नेतृत्वाचा. काँग्रेस मध्ये मुळात सर्व विचारांचा समावेश होता.चंद्रशेखर, मोहन धारिया यासारखे अनेक समाजवादी नेते काँग्रेसमध्ये सामील झाले होते. तर स्वतः पंडित नेहरू सोव्हिएट युनियनच्या पंचवार्षिक योजना आदी आर्थिक नियोजनाच्या कार्यक्रमानी प्रभावित होते. रघुपती राघव राजा राम
हे गीत तर काँग्रेसचा आत्मा मानला जातो. अर्थात समाजवादी, डाव्या, उजव्या या सर्व विचारांचा त्याचबरोबर प्रादेशिक अस्मितेचा समुच्चय केवळ काँग्रेस मध्ये आढळून येतो. आणि देशव्यापी केवळ काँग्रेसच असल्याने ही आघाडी केवळ काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली होऊ शकते. इथे नेतृत्वाचा प्रश्न गैरलागू आहे. डॉ मनमोहनसिंग यांच्याप्रमाणे सर्वमान्य नेतृत्व येऊ शकत किंवा भाजपविरोधी पक्षातील सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजे अर्थात काँग्रेसला पर्यायाने नेहरू -गांधी परिवाराला नेतृत्व दिल जाऊ शकत. पण यासाठी२७२ हा जादुई आकडा गाठण्यासाठी एकास एक लढत होणं ही काळाची गरज आहे.१९७७ साली सर्व पक्षांनी काँग्रेसविरुद्ध एकत्र येऊन हा प्रयत्न केला आहे. यावेळी भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करण्याची गरज आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतुन शिवसेना आता बाहेत पडली आहे.अकाली दल, आणि जनता दल (युनायटेड)याखेरीज त्यांच्याकडे नाव घेण्याजोगे मित्रपक्ष नाहीत. पण 303 जागा घेत भाजप स्वतः मात्र खूप मोठा पक्ष झाला आहे.

अतिरेकी उजव्या विचारसरणीच्या भाजपला सत्तेतून घालवायचे असेल तर सर्व भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, त्यातून एकही पक्ष बाहेर राहिला तर भाजपचा यशाचा मार्ग सुकर होईल. शिवसेनेने याची सुरवात महाराष्ट्रात केली आहे, सेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर भाजप टिकू शकत नाही हे सिद्ध आहे.

 

महाराष्ट्र पॅटर्न जर देशात राबविला गेला तर केंद्रातही भाजप विरोधी बाकावर अन इतर पक्ष सत्तेत असतील. पण ते होऊ नये म्हणूनच की काय सामान्य माणसांपुढे भावनिक मुद्दे उपस्थित करून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित केले जात आहे. आज नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या उंचीचे नेतृत्व कोणत्याही पक्षाकडे नाही हे मान्यच करायला हवे. नरेंद्र मोदी हे सर्व समावेशक नेतृत्व होऊ शकत नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कठोर भूमिकेमुळे भाजप आणि रा स्व संघातही त्यांच्या विरोधकांचा आकडा वाढत आहे . त्यातील नेत्यांनी भाजप विरोधी आघाडीशी हातमिळवणी करायला हवी.

मला याक्षणी इंग्लंड चे पंतप्रधान विन्स्टन चर्चिलची आठवण होते. चर्चिलने म्हटले होते की हिटलरला हरवण्यासाठी मी स्टॅलिन च काय सैतानाची देखील मदत घेईल. आज भारतीय राजकारणात तशाच पद्धतीने सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरुद्ध उभे राहण्याची गरज आहे. भारतातील भाजपविरोधी पक्षांनी त्यातून येत्या चार वर्षात बोध घेतल्यास उत्तम.नाहीतर मोदींना तिसरी टर्म मिळाल्यास ती संसदीय पद्धतीच्या लोकशाहीची अखेर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here