साडेतीन कोटीची पाणीपुरवठा योजना बसली कोठारीकरांच्या मानगुटीवर

0
726

साडेतीन कोटीची पाणीपुरवठा योजना बसली कोठारीकरांच्या मानगुटीवर
चार वर्षांपासून कोठारीकराना पाण्याची प्रतीक्षा

 

कोठारी / राज जुनघरे
खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्च करून कोठारीत नळयोजनेचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्षाचा काळ लोटला तरीही नलयोजनेचे पाणी गावकऱ्यांच्या घरात आले नाही.सदर बांधकाम गावातील शोभेची वस्तू ठरली असून साडेतीन कोटींची नळयोजना कोठारीकरांच्या मानगुटीवर बसली आहे.

मागील पंधरा वर्षांपासून कोठारीत अस्तिवात असलेली जुनी पाणीपुरवठा क्षुल्लक करणपोटी व ग्राम पंचायतीच्या नाकर्तेपणामुळे बंद पडलेली होती.गावात पाण्याची तीव्र टंचाई असून गावकर्यांना हातपंपाच्या दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.दूषित पाण्याच्या नियमित पाणी वापराने नागरिकांना अनेक शारीरिक व्याधी व रोगाचा सामना करावं लागतं आहे.गावातील पाणीसमस्या तीव्र होत असल्याची दखल प्रशासन व बल्लारपूर विधान सभेचे आ. सुधीर मुंगणतीवर यांनी घेतली व गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी खनिज विकास योजनेतून साडेतीन कोटी मंजूर करण्यात आले.जीवन प्राधिकरण विभागाच्या देखरेखेखाली योजनेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.वर्धा नदीचे पाणी जलशुद्धीकरणाद्वारे शुद्ध करून नळाद्वारे गावकर्यांना पुरवठा करण्यात येणार असल्याची योजना होती.चार वर्षांपूर्वी योजनेची चाचणी करण्यात येऊन ग्राम पंचायत कोठारीकडे हस्तांतरित करुन लोकार्पण झाल्याला चार वर्षाचा कालावधी लोटला.योजनेचे काम होऊनही। गावकर्यांना पाणी का देण्यात येत नाही याबाबत सरपंचांना अनेकदा विचारणा करण्यात आली मात्र त्यावर ब्र शब्दही बोलण्यास तयार नसून तृट्या दूर करून पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत गावकऱ्यांची बोळवण करीत चार वर्षे प्रतीक्षेत गेले.मात्र पाणी सुरू होऊ शकले नाही.सरपंचाची गावाच्या ज्वलंत समस्येकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार गावकऱ्यांच्या जीवरी लागला असल्याने नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

घरोघरी नळाचा फज्जा उडाला
गावात नळाचे पाणी घरोघरी पोहचले पाहिजे यासाठी १५ वित्त आयोगातून १० लक्ष रुपयाचा निधी खर्च करून ४९९ घरात मोफत नळ ग्रापच्या देखरेखेखाली ठेकेदारामार्फत बसवून चार महिने लोटले.त्यासाठी गावातील सिमेंट काँक्रीट रस्ते फोडण्यात आले.नळाच्या कामासाठी गावातील मजबूत रस्ते उध्वस्त झाले.त्याची दुरुस्तीची करण्यात आली नाही.त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्याची दैनावस्था झाली आहे.रस्ते नादुरुस्त व पाणीही थेंबभर घागरीत आले नाही.परिणामी नागरिकांना दुहेरी समस्येला समोर जावे लागत आहे.नळयोजनेचे साडेतीन कोटी व मोफत नळाचे कनेक्शन साठी दहा लक्ष निधी पाण्यात गेल्याचा संतापजनक प्रकार कोठारीत दिसून येत आहे.

बांधकामाची चौकशी करा
साडेतीन कोटीच्या नळयोजना बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून त्यामुळेच नळयीजना सुरू करण्यास अडचण होत आहे.निकृष्ट काम,निकृष्ट पाईपलाईनचे काम जीवन प्राधिकरण अधिकारी व ग्राप पदाधिकाऱ्यांचे देखरेखीत झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय निर्माण झाला आहे.या बांधकामाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सोमवरला महिलांचा घागर मोर्चा
मागील चार वर्षांपासून नवीन पाणीपुरवठा योजने पासून गावकरी वंचित आहेत ग्राम पंचायत पदाधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून त्यांचे नाकर्तेपणाची झळ गावकर्यांना सहन करावी लागत आहे.आज नाही उद्या पाणी येणार या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असल्याने २१ फेब्रुवारीला ग्राम पंचायतीवर महिलांचा घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यात ग्राम पंचायत प्रशासनाचा निषेध करीत १० मार्च पर्यंत पाणी सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल.
धीरज बांबोडे, वंचित बहुजन आघाडी, कोठारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here