मुजोर अट्टल रेती माफियांना वरदान कोणाचे…?

0
973

मुजोर अट्टल रेती माफियांना वरदान कोणाचे…?

नागरिकांनी पकडलेल्या रेती भरलेल्या ट्रॅक्टर प्रशासनाच्या ढिसाळपणाने सुटल्या मोकाट

 

 

विरुर स्टे./राजुरा, २८ नोव्हें. : रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान विरुर वासीय नागरिकांनी रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर पकडून याची माहिती महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला दिली. मात्र यावर संबंधित दोन्ही विभागाकडून कोणतीच कारवाई न करता या मुजोर रेती माफियांची पाठराखण केली जात आहे असा सूर आता जनतेतून उमटत आहे. प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या सुजाण नागरिकांवर प्रशासनाच्या वरदहस्तामुळे सदरच्या रेती माफियांडून विघातक कृत्य करून हानी पोहचविण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कार्यप्रणाली मुळे रेती माफियांची मुजोरी दिवसागणिक वाढत चालली आहे. यामुळे स्थानिक रेती माफियांना वरदान कोणाचे…? हा एकच यक्ष प्रश्न विरुर वासीय जनतेला पडला आहे.

सविस्तर वृत्त असे की, विरुर येथील रेती माफियांनी खांबाडा घाटाला ओरबडण्याचे काम सुरू केले असून मागील तीन ते चार दिवसांपासून रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास रोज रेतीची चोरटी वाहतूकीने बरीच भंबेरी उडविली आहे. यामुळे बसस्थानक ते मातामंदिर या रस्त्याच्या बाजूला घरे असलेल्यांची चांगलीच झोपमोड होत आहे. यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी रात्री १२ वाजेच्या आसपास दोन रेती भरलेल्या ट्रॅक्टर अडवून महसूल प्रशासनपोलीस प्रशासना ला दूरध्वनी वरून माहिती दिली. वारंवार फोन करूनही तालुक्याचे महसूल अधिकारी यांनी प्रतिसाद दिला नाही. तर स्थानिक पोलीस प्रशासनाकडूनही यावर कारवाई करण्याऐवजी ट्रॅक्टर पसार होण्यास सहकार्य केल्याची खंत नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे.

प्रशासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला रेती माफियांकडून चुना लावला जात असून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांनी आपली आपबिती कोणाकडे मांडायची…? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

“रात्रपाळीत या रस्त्याने चार ते पाच हायवाने रेतीची तस्करी होत असून या रेती माफियांकडून प्रती हायवा पाच हजार रुपये ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मेहेरमाया दिली जाते. अशी चर्चा स्थानिक जनतेत ऐकिवात आहे. सदर प्रकारावर आळा घालण्यासाठी तालुका महसूल अधिकारी व विरुरचे ठाणेदार कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.”

नागरिकांनी पकडलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई होऊन शासनाला महसूल मिळेल अशी आशा नागरिकांना होती. मात्र संबंधित प्रशासनाच्या असंवेदशील कर्तव्य कसुरतेमुळे रेती भरलेल्या ट्रॅक्टर मोकाट सुटल्या. जर प्रशासनच फक्त म्याऊ म्हणण्याच्या भूमिकेत असेल तर हे अट्टल रेती माफिया प्रशासनाला दात दाखवत आडकाठी ठरणाऱ्या सुजाण नागरिकांना दमदाटी करून समाज विघातक कृत्य करण्यास सरसावतील व वाममार्गाला पाठबळ मिळेल, असे म्हटल्यास काही एक वावगे ठरणार नाही. भविष्यात सामाजिक व जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण…?

 

 

प्रशासनाची मेहेरनजर आहे का ?
तालुक्यात कोणत्याच रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. मात्र विरुर जवळील खांबाडा रेती घाटात स्थानिक विरुर येथील रेती माफियांनी आपला मोर्चा वळविला असून रात्रपाळीत रेतीचा वारेमाप उपसा केल्या जात आहे. या रेती घाटात मोठमोठे खड्डे खोदून रेतीचा उपसा केला जात असल्याने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. शिवाय जवळील शेतीचे नुकसान व रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. स्थानिक ठिकाणी असलेले पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी या रेती माफियांबाबत अनभिज्ञ आहेत का? केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाची मेहेरनजर आहे का…? अशा एक ना अनेक चर्चांना या घडलेल्या टाळाटाळीच्या प्रकारामुळे जनमानसात चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे. प्रकारामुळे प्रशासनाविरोधात जनतेत प्रचंड असंतोष पहावयास मिळत असून महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाची भूमिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here